छत्रपती संभाजीनगरजवळ चारचाकीने दुचाकीला पाठीमागून उडवले, तिघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:07 IST2025-05-07T12:04:48+5:302025-05-07T12:07:42+5:30
चिकलठाणा पोलिसांनी कारमधील पाचजणांना ताब्यात घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगरजवळ चारचाकीने दुचाकीला पाठीमागून उडवले, तिघांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गांधेली परिसरातील हॉटेल पल्लवीसमोरील कटपॉइंटसमोर धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला (एमएच २० एचजी ०१४२) पाठीमागून वेगात येणाऱ्या चारचाकी कारने (एमएच २० जीव्ही ९६६४) उडवले. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. मंगळवारी (दि. ६) रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी सांगितले.
मृतांमध्ये शेख रफिक शेख गफूर (५०, रा. सईदा कॉलनी, जटवाडा), शेख मोईन शेख हरलाल (रा. जिन्सी) आणि शेख आदिब शेख अनवर (रा. शहाबाजार) यांचा समावेश आहे. मृत तिघेही गांधेली परिसरात कामानिमित्त गेले होते. तेथून शहराकडे दुचाकीवर येत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीला उडवले. वेग जास्त असल्यामुळे दुचाकीवरील तिघे दूरवर फेकले गेले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे जागीच गतप्राण झाले.
माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तिघांना ॲम्ब्युलन्समधून घाटी रुग्णालयात पाठविले. चिकलठाणा पोलिसांनी कारमधील पाचजणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पाचजण पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घटनास्थळाला पोलिस उपअधीक्षक पूजा नागरे, पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे, पोलिस उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देत पंचनामा केला.
घटनास्थळी रक्ताचा सडा
चारचाकीने दुचाकीला जोरात धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर जोरात आपटले. त्यात त्यांचे डोके फुटले. त्यामुळे घटनास्थळावर रक्ताचा सडा पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
चारचाकीतील काही जखमी
चारचाकी गाडीचेही समोरील बाजूने मोठे नुकसान झाले. त्यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मिनी घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहितीही चिकलठाणा पोलिसांनी दिली.