भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:27 IST2025-07-18T18:26:08+5:302025-07-18T18:27:41+5:30
छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात; ट्रकखाली सापडून पती व दोन मुलांचा अंत,पत्नी गंभीर जखमी

भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
- ज्ञानेश्वर चोपडे
आळंद (छत्रपती संभाजीनगर) : शेतीच्या कामासाठी दुचाकीवरून जात असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गावाजवळच रस्ता ओलांडताना मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने पती आणि दोन चिमुकल्या मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.
ही दुर्घटना शुक्रवारी (दि. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास आळंद गावाजवळील गणपती मंदिर फाट्याजवळ घडली. मृतांमध्ये गोपाल मंगलसिंग चंदनशे ( ३६ ) , मुलगा हृदय (७) आणि मुलगी अवनी (९) यांचा समावेश आहे. पत्नी मीनाबाई ( ३२) गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गोपाल चंदनशे हे पत्नी व दोन मुलांसह मूळगाव सताळा बु. येथे शेतीच्या कामासाठी निघाले होते. दरम्यान, आळंदजवळ सिल्लोडहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या मालवाहक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील चारही जण जवळपास शंभर फूट फरफटत गेले.
अपघातानंतर ट्रक थांबली. ग्रामस्थांनी तत्काळ मदतीला धाव घेतली. क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून जखमींना रुग्णवाहिकेतून फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी गोपाल आणि दोन्ही मुलांना मृत घोषित केले. जखमी मीनाबाई यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.