स्विडनमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या तरुणीचा पतीकडून छळ; खोट्या तक्रारीने १८ दिवस तुरुंगवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 19:52 IST2025-07-07T19:51:26+5:302025-07-07T19:52:01+5:30
उच्चशिक्षित पतीचा प्रताप,स्विडनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी पत्नीला बनवाबनवीत अडकवले!

स्विडनमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या तरुणीचा पतीकडून छळ; खोट्या तक्रारीने १८ दिवस तुरुंगवारी
छत्रपती संभाजीनगर : स्विडनचे नागरिकत्व मिळविण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीने समपदस्थ पत्नीविरोधात किचनमधील चाकूने हल्ला केल्याचा बनाव करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला. त्यावरून पत्नीला १८ दिवस स्विडनच्या कारागृहात राहावे लागले. विवाहितेच्या माहेरच्यांना हा बनाव कळल्यानंतर त्यांनी भारतीय उच्चायुक्तांकडे तक्रारी नोंदवून तिची सुटका करून घेतली. माहेरी परतल्यानंतर विवाहितेने पती, सासु-सासरे, दीर आणि मामे सासरे यांनी मागील चार वर्षांत केलेल्या मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दिल्यावरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
कन्नड तालुक्यातील वासडी येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव चव्हाण यांची सॉफ्टवेअर इंजिनीअर मुलगी श्रेया हिचा विवाह वैजापूर तालुक्यातील करंजगाव जि.प. शाळेचा मुख्याध्यापक राधाकिसन सांबरे (रा. गोळवाडी, ता. वैजापूर) याचा अभियंता मुलगा राहुल सोबत ५ एप्रिल २०२१ रोजी मोठ्या थाटामोटात लाऊन दिला. काही दिवसांनंतर श्रेयाला सासरी लग्नातील मानापानावरून त्रास देण्यास सुरुवात झाली. हुंड्यापोटी २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. श्रेयाच्या वडिलांनी साडेपाच लाख रुपये दिले, तरीही त्रास थांबला नाही. विवाहिता भारतात आल्यानंतर मुख्याध्यापक सासरा राधाकिसन, सासू लीला, दीर वैभव आणि मामे-सासरा बाळासाहेब थोरात हे प्रचंड त्रास देत होते. तिचा बळजबरीने गर्भपातही केला. बाथरूम साफ करण्याचे फिनेल पाजण्यात आले. या गंभीर प्रकारामुळे विवाहितेला वडील व भावाने माहेरी आणले. त्यानंतर सासरच्यांनी यापुढे त्रास देण्यात येणार नाही, असे गोड बोलून १६ मे रोजी स्विडनला पाठविले.
त्याठिकाणी गेल्यानंतर पती राहुलने १७ मे रोजी पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्याही अंगावर ओरखाडे आले होते. त्याचेच भांडवल करीत त्याने स्विडन पोलिसात पत्नीने माझ्यावर किचनमधील चाकूने जिवघेणा हल्ला केला. तिच्यासह नातेवाइकाकडून माझ्या जिवाला धाेका असल्याची तक्रार दिली. त्यानुसार स्विडन पोलिसांनी पत्नीला १८ मे रोजी अटक केली. या घटनेविषयी राहुलने पत्नीच्या माहेरी काहीही कळू दिले नाही. शेवटी विवाहितेच्या भावासह वडिलांनी भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. या प्रकरणात तिला ४ जून रोजी तेथील न्यायालयातून जामीन मंजूर झाला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर ५ जून राेजी विवाहिता देशात परतली.
स्विडनचे नागरिकत्व मिळविण्यासाठी बनाव
राहुलला स्विडनचे नागरिकत्व हवे आहे. यासाठी त्याने पत्नीसह तिच्या माहेरच्या लोकांकडून माझ्या जिवाला धोका असल्याचे दाखविण्यासाठी पत्नीला गंभीर गुन्ह्यात अडकवले. त्याचवेळी माहेरच्या लोकांच्या विरोधातही कागदपत्रे स्विडन पोलिसांकडे दिल्याची माहिती समोर आली. त्याशिवाय स्विडनमधील श्रेयाच्या नावावरील घर, दागिन्यांसह पैसे त्याने बळकावण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.