समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर
By विकास राऊत | Updated: August 12, 2025 19:16 IST2025-08-12T19:14:18+5:302025-08-12T19:16:20+5:30
हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याने प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत

समृद्धी महामार्गालगत ताशी २५० किमी वेगाने धावणारी हायस्पीड रेल्वे पुन्हा अजेंड्यावर
छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव साडेतीन वर्षांपासून गुलदस्त्यात राहिल्यानंतर आता पुन्हा त्यावर चर्चा सुरू झाली आहे. १० ऑगस्ट रोजी नागपूर येथील एका कार्यक्रमात समृद्धी महामार्गालगत हायस्पीड रेल्वे धावण्याच्या प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याने प्रकल्प पुन्हा अजेंड्यावर येण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटरचा ट्रॅक समृद्धी महामार्गालगत बांधणीचा विचार होऊन साडेतीन वर्षे झाली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडकडे (एनएचआरसीएल) यासाठी डीपीआर करणार होते. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर ऑफिसही सुरू करण्यात आले होते. ते कार्यालय निवडणूक आचारसंहितेसाठी आता पालकमंत्री कक्षासाठी वापरले जात आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
समृद्धी महामार्गाला लागून समांतर हायस्पीड रेल्वे जी ताशी २५० ते ३०० वेगाने धावेल असा प्रस्ताव होता. समृद्धीचे बांधकाम होत असताना रेल्वे मंत्रालयाने नागपूर ते मुंबईपर्यंत हायस्पीड रेल्वेवर अभ्यास केला आहे. ७८ टक्के काम गतीने होणे शक्य होते. २२ टक्के काम सयुंक्तपणे करावे लागणार आहे. याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करून निर्णय घेऊ
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (१० ऑगस्ट, नागपूर)
हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित प्रकल्प असा होता:
एकूण लांबी : ७४९ किलोमीटर
किती स्थानके? : १२
किती जिल्हे जोडणार? : १०
भूसंपादन किती? : १२४५.६१ हेक्टर
रेल्वेचा ताशी वेग किती? : ३३० ते ३५० कि.मी.
प्रवासी वाहतूक क्षमता : ७५०
एकूण किती बोगदे? : १५, लांबी : २५.२३ कि. मी.
समृद्धी महामार्गालगत १७.५ मीटर रुंदीचा मार्ग
या ठिकाणी रेल्वे स्टेशन
अजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रुक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित होते.
किती भूसंपादन करावे लागेल?
जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ कि.मी. अंतरातून हायस्पीड रेल्वेचा मार्ग प्रस्तावित आहे. यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर जमीन संपादित करावी लागेल. त्यात ७३.७३ हेक्टर जमीन खाजगी तर ९४.२२ हेक्टर जमीन सरकारी असेल. सरकारी २०१ तर ४१० खाजगी भूखंड संपादित करावे लागतील. संभाजीनगर तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१० तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे.