छत्रपती संभाजीनगरात अवजड वाहनामुळे बळी, सिमेंट मिक्सरच्या चाकात अडकून तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:23 IST2025-02-20T13:22:17+5:302025-02-20T13:23:18+5:30
अवजड वाहनांबाबत पोलिसांचे 'साेयीस्कररीत्या दुर्लक्ष', नियम नसल्याने सुसाट

छत्रपती संभाजीनगरात अवजड वाहनामुळे बळी, सिमेंट मिक्सरच्या चाकात अडकून तरुणीचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : बेबंद झालेल्या हायवा, वाळू, सिमेंट मिक्सरने शहरात पुन्हा एक बळी घेतला. सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून सईदा अखील शेख (३२, रा. मुकुंदवाडी) यांचा अंत झाला. मंगळवारी शहानूरमियाँ दर्गा चौकात रात्री ९:३० वाजता हा अपघात झाला.
सईदा गृहिणी होत्या. मंगळवारी सायंकाळी त्या फार्मासिस्ट असलेला मित्र शेख मोहम्मद अझहरसोबत रात्री दुचाकीने शहानूरमियाँ दर्गा परिसरात पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या होत्या. तेथून ते बीड बायपासच्या दिशेने जात होते. यावेळी दर्गा चौकातून आलेल्या सुसाट सिमेंट मिक्सर हायवाने (एम एच २० -जीझेड - २२९९) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे अझहर यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले व सईदा थेट हायवाच्या चाकाखाली सापडल्या. हायवा चालकाने तरीही हायवा पुढे दामटला. यात सईदा गंभीर जखमी झाल्या. दूर फेकले गेलेले अझहरदेखील जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत सईदा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, मध्यरात्री २ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अझहर यांच्या तक्रारीवरून हायवा चालकाविरोधात जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक अतिश लोहकरे तपास करत आहेत.
टँकरमुळे वृद्धाने पाय गमावला
भरधाव पाण्याच्या टँकरमुळे सोमनाथ जाधव (६०, रा. जयभवानीनगर) यांना उजवा पाय गमवावा लागला. ९ फेब्रुवारी रोजी ते सायंकाळी ७:३० वाजता मुकुंदवाडीतून पायी जात असताना पाण्याचा टँकर विजेच्या खांब्याला धडकून त्यांच्या अंगावर पडला. यात जाधव यांच्या शरीराचा उजवा भाग गंभीर जखमी झाल्याने मांडीपासून कापावा लागला.
सातत्याने मृत्यू, तरीही....
२९ जानेवारी रोजी मिनी घाटीसमोर वाळू हायवाखाली चिरडून मालन चौधरी (५०, रा. सुंदरवाडी) यांचा मृत्यू झाला. शहरात नागरी वसाहत, अरुंद रस्त्यांवरून अवजड वाहने सुसाट दामटली जातात. बीड बायपासवरदेखील अशा वाहनांवर कुठलेही निर्बंध नाहीत. परिणामी, एकीकडे नागरिकांचे जीव जात असताना पोलिस मात्र बेजबाबदारपणे दुर्लक्ष करत आहेत.