छत्रपती संभाजीनगरात पावसाचा धुमाकूळ; हर्सूल तलाव एका रात्रीत तुडुंब, खाम नदीला पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:04 IST2025-09-29T13:56:26+5:302025-09-29T14:04:59+5:30
शहर परिसरातील आठही मंडळांत म्हणजेच सुमारे १६० वसाहतींमध्ये अतिवृष्टी झाली.

छत्रपती संभाजीनगरात पावसाचा धुमाकूळ; हर्सूल तलाव एका रात्रीत तुडुंब, खाम नदीला पूर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील चारही दिशांना शनिवारी सायंकाळपासून रविवारी सकाळपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत झालेल्या पावसाने हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागला. पूर आल्यामुळे खाम नदीलगतच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. शहरात ५८ मि.मी., तर जिल्ह्यात ११० मि.मी. पाऊस झाला.
शहर परिसरातील आठही मंडळांत म्हणजेच सुमारे १६० वसाहतींमध्ये अतिवृष्टी झाली. शहरातील काही वसाहतींमध्ये नागरिकांनी रात्र जागून काढली. आपत्ती व्यवस्थापनासह सर्व यंत्रणांकडून रविवारी दुपारपर्यंत बचावकार्य सुरू होते. हर्सूल तलाव भरून वाहू लागल्याने परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मनपाने या परिसरात सुरक्षारक्षक तैनात केले.
कुठे किती पाऊस?
शहर परिसर ८७ मि.मी., उस्मानपुरा ८७, भावसिंगपुरा ९९, कांचनवाडी १४२, चिकलठाणा ६६, चौका १००, पंढरपूर ८२, पिसादेवी ६६, वरूड काझी ६६ मि.मी.
ईटखेडा जलमय
शनिवार रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ईटखेडा वॉर्डातील रेवती अभिनंदन हौसिंग सोसायटी, श्रीरंग सिटी, जगदाळे मळा, सेंट जॉन शाळेजवळील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शिवसमाधान कॉलनी येथे पाणी साचल्यामुळे ईटखेडा गावाला जोडणारा मुख्य रस्ता बंद झाला. स्मशानभूमीतही पाणी साचले. मनपा प्रशासक जी. श्रीकांत, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली. परिसरातील नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमित केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून पाणी वसाहतींमध्ये शिरले. प्रशासकांनी संबंधित यंत्रणेला नाल्यावरील झालेले अतिक्रमण काढून नाले मोकळे करण्याचे आदेश दिले.
शहरातील १४ वॉर्डांचा पाणीप्रश्न मिटला
हर्सूल तलावाची पाणी पातळी दोन दिवसांपूर्वीच २६ फूट होती. रविवारी पहाटे तो ओसंडून वाहू लागला. तलाव पूर्ण भरल्यामुळे शहरातील १४ वॉर्डांचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. तलावाची पाणीपातळी २८ फूट आहे. ९ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारून त्यातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही हर्सूल तलाव भरला नव्हता.