अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:28 IST2025-10-30T19:27:56+5:302025-10-30T19:28:59+5:30
वैजापूर तालुक्यातील सव्वालाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब!
- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र, दिवाळी होऊनही अद्याप निधी मिळाला नसल्याने तालुक्यातील १ लाख २४ हजारांहून अधिक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ९३ कोटींहून अधिक रकमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवूनही निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली आहे.
वैजापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील १ लाख २४ हजार १८७ शेतकऱ्यांची १ लाख ७ हजार ७८० हेक्टर जमीन बाधित झाली. यात १ लाख ६ हजार ३५८ हेक्टर जिरायती, ७४४ हेक्टर बागायती आणि ७७८ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी तहसील प्रशासनाने शासनाकडे ९३ कोटी २४ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे; परंतु, अद्यापही मदतीची रक्कम वैजापूरसाठी प्राप्त झालेली नाही, त्यामुळे सव्वालाख शेतकऱ्यांना मदतीच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे.
दिवाळीपूर्वी मदत मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची शासनाकडून निधी न मिळाल्याने ऐन सणासुदीत मोठी आर्थिक कोंडी झाली. राज्य शासनाकडे अहवाल जाऊनही रक्कम प्राप्त न झाल्याने मदतीची वाट पाहत असलेला बळीराजा सध्या हवालदिल झाला आहे.
दिवाळी झाली; पण मदतीची आस कायम
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक घरांचीही पडझड झाली. तालुक्यात प्रशासनासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना त्वरित मदतीचे आश्वासन दिले होते. प्रशासनाच्या सूचनेनुसार पंचनामेही वेळेत पूर्ण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा दिवाळीपूर्वी मदत मिळेल या आशेवर लागल्या होत्या; परंतु राज्य शासनाच्या कचखावू भूमिकेमुळे दिवाळी होऊनही अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही.
अद्यापही मदत मिळालेली नाही
मुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.
-छगन सोमवंशी, शेतकरी, म्हस्की
मदत का मिळत नाही?
शेजारच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची चर्चा आहे; मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत का मिळत नाही, असा प्रश्न आहे.
- साहेबराव औताडे, शेतकरी, बेलगाव
अनुदान प्राप्त झालेले नाही
शासनाकडून अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीची मदत देण्यात आलेली नाही.
-सुनील सावंत, तहसीलदार