मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; पिकांचे नुकसान १७ लाख हेक्टवर, शेतकरी हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:53 IST2025-09-19T19:52:18+5:302025-09-19T19:53:09+5:30
मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांत जून, जुलै व ऑगस्ट या ३ महिन्यांमध्ये सरासरी ५१३.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत ५८१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; पिकांचे नुकसान १७ लाख हेक्टवर, शेतकरी हतबल
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावत असून, अतिवृष्टीचे सत्र सुरूच आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला तर सप्टेंबरमध्ये पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.
दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत प्रत्येकी २ तर परभणी जिल्ह्यात एक अशा पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यांत जून, जुलै व ऑगस्ट या ३ महिन्यांमध्ये सरासरी ५१३.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. त्या तुलनेत ५८१.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर १८ सप्टेंबरपर्यंत परतीच्या पावसाने सरासरी ओलांडली आहे. विभागातील ८ जिल्ह्यांत या तारखेपर्यंत जूनपासून ६१३.१ मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित होता त्या तुलनेत ७२७.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पिकांचे नुकसान १७ लाख हेक्टरवर
मराठवाड्यात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान १७ लाख हेक्टरवर गेल्याचा अंदाज असून, पंचनामे सध्या सुरू आहेत.
जिल्हानिहाय अपेक्षित व झालेला पाऊस
छत्रपती संभाजीनगर : पाऊस अपेक्षित ५२१.५ मिमी, झालेला : ६११.१ मिमी
जालना : पाऊस अपेक्षित ५४६.४ मिमी, झालेला : ६८१.६ मिमी
बीड : पाऊस अपेक्षित ४९७.३ मिमी, झालेला : ६४१.६ मिमी
लातूर : पाऊस अपेक्षित ६३३.६ मिमी, झालेला : ६८४.४ मिमी
धाराशिव : पाऊस अपेक्षित ५२९.२ मिमी, झालेला : ६६०.८ मिमी
नांदेड : पाऊस अपेक्षित ७४७.४ मिमी, झालेला : ९५३.८ मिमी
परभणी : पाऊस अपेक्षित ६९३.७ मिमी, झालेला : ७१५.६ मिमी
हिंगोली : पाऊस अपेक्षित ७३३.४ मिमी, झालेला : ८८९.७ मिमी
विभागातील मंडळात अतिवृष्टी
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील मटूळ मंडलात ७० मिलिमीटर, उमरी तालुक्यातील सिंधी मंडलात ८३.२५, धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ६५.५० व जळकोट मंडलात ८८ मिलिमीटर तर परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील बामनी मंडलात ९४.५० मिलिमीटर पाऊस बरसला.