मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; ४० मंडळांतील १२०० गावांत जोरदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:10 IST2025-10-30T12:08:40+5:302025-10-30T12:10:43+5:30
२८ सप्टेंबरनंतर २८ ऑक्टोबरलाही रात्रीतून दमदार पाऊस

मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; ४० मंडळांतील १२०० गावांत जोरदार पाऊस
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच असून, २७ सप्टेंबर रोजी रात्रीतून विभागात १८९ मंडळांतर्गत येणाऱ्या ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. आता २८ ऑक्टोबर म्हणजेच एक महिन्याने रात्रीतूनच विभागातील ५ जिल्ह्यांतील ४० मंडळांत येणाऱ्या १२०० गावांना पावसाने झोडपले.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत तुफान पाऊस झाला. सप्टेंबरमधील ३० दिवसांमध्ये विभागात ३६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर ऑक्टोबरमधील २८ दिवसांत ८० मि.मी. पाऊस मराठवाड्यात बरसला. मंगळवारी दिवस व रात्रीतून २९ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत विभागात एकूण २४.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ६२.२ मि.मी. पाऊस लातूर जिल्ह्यात झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २२ मि.मी., जालना २८, बीड २८, धाराशिव ८, नांदेड ७, परभणी २६ तर हिंगोली जिल्ह्यात ४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
७ मंडळांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस
मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात सुमारे १३ दिवसांत ७२५ मंडळांत धुवाधार पाऊस बरसल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस ४० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवार रात्रीतून बुधवारी पहाटेपर्यंत २९ रोजी सकाळपर्यंत ४० पैकी ७ मंडळांत १०० ते १६० मिमीदरम्यान पाऊस झाला आहे. एकूण ८०० गावांच्या हद्दीत हा पाऊस झाला आहे. विभागातील ४०० मंडळे अशी आहेत, ज्यामध्ये मागील दोन महिन्यांत वारंवार पाऊस झाल्याने तेथील खरीप पिकांचा चिखल झाला.
जूनपासून आजवर १३३ टक्के पाऊस...
मराठवाड्यात जूनपासून आजवर १३३ टक्के पाऊस झाला आहे. ६७९ मि.मी.च्या तुलनेत १ हजार २९ मि.मी. पाऊस झाला आहे. ३५० मि.मी. अतिरिक्त पाऊस यंदाच्या पावसाळ्यात झाला आहे. पाच जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत १ हजार मि.मी.च्या पुढे पाऊस झाला आहे. तर तीन जिल्ह्यात ९५० मि.मी.च्या आसपास पाऊस बरसला.
कोणत्या जिल्ह्यात किती मंडळात अतिवृष्टी?
जिल्हा.........................एकूण मंडळे
छत्रपती संभाजीनगर.... १
जालना................२
बीड...............७
लातूर..........२८
परभणी............२
एकूण........४०
दोन महिन्यांतील १४ दिवसांत ७६५ मंडळांत अतिवृष्टी
तारीख........अतिवृष्टी...
१३ सप्टेंबर.........१९
१४ सप्टेंबर..........५३
१५ सप्टेंबर..........३२
१६ सप्टेंबर...........४१
१७ सप्टेंबर...........१५
१८ सप्टेंबर...........०५
१९ सप्टेंबर...........०७
२० सप्टेंबर...........१०
२१ सप्टेंबर...........०९
२२ सप्टेंबर.........७५
२३ सप्टेंबर.........१२९
२६ सप्टेंबर.........१४१
२८ सप्टेंबर.........१८९
२८ ऑक्टोबर........४०
एकूण.............७६५