मोबाइलमध्ये मग्न, कानात हेडफोन, रेल्वे आल्याचेही कळले नाही; धडकेत तरुणाचा मृत्यू
By सुमित डोळे | Updated: October 6, 2023 12:03 IST2023-10-06T11:58:52+5:302023-10-06T12:03:04+5:30
मोबाइलमध्ये इतका मग्न की पाठीमागून ओरडणाऱ्या भावाचा आवाजही एकला नाही

मोबाइलमध्ये मग्न, कानात हेडफोन, रेल्वे आल्याचेही कळले नाही; धडकेत तरुणाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : हातात मोबाईल, कानात हेडफोन टाकून तो मग्न होऊन चालत होता. पाऊलवाटेने चालताना रेल्वेरुळ आल्याचेही त्याला कळले नाही व सुसाट आलेल्या रेल्वेचा धक्का लागून राम दिलीप जटाळे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मावस भावासोबत तो नाश्ता करुन हॉस्टेलच्या दिशेने जात असताना बुधवारी दुपारी दोन वाजता हा अपघात घडला.
मूळ नांदेड जिल्ह्यातील किनवटचा असलेला राम आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. विवेकानंद महाविद्यालयात बारावीत त्याचा प्रवेश होता. मावस भाऊ सतीश नामदेव भुरके व गावाकडील मुलांसह तो दोन वर्षांपूर्वी आश्रमात शिक्षणानिमित्त राहण्यासाठी आला होता. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी सतीश सोबत तो शिवाजीनगर परिसरात नाश्ता करण्यासाठी गेला होता. नाश्ता करून पावणे दोनच्या सुमारास परत हॉस्टेलकडे निघाला असताना हा अपघात झाला.
इतका मग्न की भावाचा आवाजही पोहोचला नाही
नाश्ता करुन परतत असताना राम मोबाईलच्या नादात पुढे चालत गेला. सतीश त्याच्या मागून चालत होता. कानात हेडफोन टाकलेले असल्याने त्याच तंद्रीत राम बराच पुढे चालत गेला. तो रेल्वेरुळावर जात असल्याचे लक्षात आल्यावर सतीश याने त्याला आवाज देणे सुरू केले. पण त्याच दरम्यान राम याने रेल्वेरुळावर पाऊल टाकले आणि धडकेत तो लांब फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे आई-वडील शेती करतात. एक बहीण परभणी येथे नर्सिंगचे शिक्षण घेते.