कष्टाचे चीज झालं! वीटभट्टीवर कामं करत अभ्यास, पठ्यानं दहावीत घेतले ३५ टक्के मार्क्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 18:55 IST2025-05-14T18:53:51+5:302025-05-14T18:55:03+5:30

वीटभट्टीवर आईसोबत काम; मोठ्या भावाच्या प्रेरणेने दिली होती परीक्षा

Hard work paid off! Studying while working at a brick kiln, Pathya scored 35 percent marks in 10th standard | कष्टाचे चीज झालं! वीटभट्टीवर कामं करत अभ्यास, पठ्यानं दहावीत घेतले ३५ टक्के मार्क्स

कष्टाचे चीज झालं! वीटभट्टीवर कामं करत अभ्यास, पठ्यानं दहावीत घेतले ३५ टक्के मार्क्स

- विनायक चाकुरे
उदगीर (जि. लातूर) :
घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. वडील मूकबधिर. आई वीटभट्टीवर काम करून कुटुंबाचा गाडा ओढते. मोठा भाऊ अकरावीत असल्याने आईसोबत काम करणारा उदगीर तालुक्यातील इस्मालपूरच्या नागेश पल्लेवाड यानेही भावाच्या प्रेरणेने दहावीची परीक्षा दिली आणि सर्वच विषयांत ३५ गुण मिळत गावातच नव्हे सबंध जिल्ह्यात आपल्या यशाचा लौकिक केला आहे.

एकुर्का रोड येथील समर्थ विद्यालयातील नागेश पल्लेवाड याच्या कुटुंबात एकूण चार जण. वडील जन्मताच मूकबधिर आहेत, आई वीटभट्टीवर मजुरी करते तर भावाने अकरावीची परीक्षा दिली आहे. घरामध्ये उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे नागेश आईसोबत वीटभट्टीवर कामाला जात असे. राहायला कुडाचे घर. आईसोबत वीटभट्टीवर कामाला जात असताना नागेश वेळ मिळाला तेव्हा अभ्यास करायचा. घरामध्ये शिक्षणाचे महत्त्व सांगणारे वडीलधारी कोणी नाही; परंतु मोठा भाऊ दहावी उत्तीर्ण झाला तर आपणसुद्धा दहावी उत्तीर्ण व्हावे म्हणून कष्ट करून त्यांनी फेब्रुवारीमध्ये दहावीची परीक्षा दिली. मंगळवारी जेव्हा निकाल आला तेव्हा त्यालासुद्धा आश्चर्य वाटले. ही बातमी जेव्हा आईला कळाली तेव्हा आईच्या डोळ्यांतूनसुद्धा आनंदाचे अश्रू वाहू लागले, भलेही त्यांनी पस्तीस टक्के गुण मिळविले असले तरी तो दहावी उत्तीर्ण झाला, यातच आईला अभिमान वाटत होता. वडिलांच्या चेहऱ्यावरही आनंदाच्या रेषा स्पष्टपणे दिसत होत्या.

कष्टाचे चीज झाले
दुपारी जेव्हा नागेशच्या निकालाची बातमी कळाली तेव्हा मी नागेशचे कौतुक केले. बाळा तुझ्या कष्टाचे चीज झाले! मी आज अभिमानाने सांगू शकते की, कष्ट केल्याने जीवनातील कुठलाही प्रसंग आल्यास त्यावर मात करू शकतो.
- सुनीता पल्लेवाड, आई

आई व भावामुळे यश
भावाच्या दहावी उत्तीर्ण होण्याने मला शिक्षणाबद्दल गोडी निर्माण झाली. शाळेतील सर्वच शिक्षकांनी मला सहकार्य केले व मी दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. आई व भावाने मला अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. भविष्यात मी आणखी याच्यापेक्षा मोठ्या जिद्दीने अभ्यास करून जीवनात यशस्वी होईन.
- नागेश पल्लेवाड, विद्यार्थी

Web Title: Hard work paid off! Studying while working at a brick kiln, Pathya scored 35 percent marks in 10th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.