समोर पिठाची गिरणी आत वेगळेच दळण; पोलीसही अवाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 20:19 IST2021-01-06T20:16:24+5:302021-01-06T20:19:19+5:30

गोण्यामध्ये आणि बॉक्स मध्ये प्रतिबंधीत सिगारेट, सुगंधी तंबाखू आणि गुटखा आढळून आला.

Gutkha trade started from the flour mill in Rajabazar | समोर पिठाची गिरणी आत वेगळेच दळण; पोलीसही अवाक

समोर पिठाची गिरणी आत वेगळेच दळण; पोलीसही अवाक

औरंगाबाद: राजाबाजार येथे पीठ गिरणीचा फलक लावून चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या गुटख्याच्या गोडावूनवर सिटीचौक पोलिस आणि अन्न व औषधी विभागाने मंगळवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत सुमारे २० लाख २५ हजाराचा  गुटखा आणि प्रतिबंधीत सिगारेट पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी व्यापाऱ्यासह त्याच्या नोकराला अटक केली.

दिलीप पारसमल संचेती(रा. राजाबाजार  )आणि शेख अफरोज शेख फिरोज (रा. रेंगटीपुरा ) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाई विषयी अधिक माहिती अशी की, राजाबाजार येथील सुशील फ्लोअर मीलचा फलक लावून आतमध्ये गुटखा , प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि विदेशी सिगारेट चे गोडावुन असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना दिली. यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री अन्न व औषधी विभागाचे अन्न सुरक्षा  अधिकारी प्रशांत अजिंठेकर, एस. व्ही. कुलकर्णी आणि एम. एम. सय्यद यांना सोबत घेऊन तेथे छापा टाकला.

यावेळी तेथे आरोपी दीपक संचेती आणि त्यांचा नोकर शेख अफरोज शेख फिरोज उपस्थित होते. पोलिसांनी त्यांना त्यांचा परिचय देउन आतमध्ये जाऊन पाहणी केली असता विविध गोण्यामध्ये आणि बॉक्स मध्ये प्रतिबंधीत सिगारेट, सुगंधी तंबाखू आणि गुटखा आढळून आला. या सर्व मालाचा दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. तेव्हा तेथे ११लाख १६ हजाराचे सिगारेट, आर एम डी आणि गोवा कंपनीचा ५ लाख ६१ हजाराचा  गुटखा आणि २ लाख २२ हजार ९२५ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखु चा साठा असा एकूण २० लाख २७ हजार १७९ रुपये किमतीचा माल जप्त केला.

Web Title: Gutkha trade started from the flour mill in Rajabazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.