आंघोळीविना पहिल्यांदाच गुढीपाडवा!; औरंगाबाद महापालिकेच्या नावाने नागरिकांची ओरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 14:51 IST2019-04-07T14:44:49+5:302019-04-07T14:51:05+5:30
सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगरमध्ये नागरिकांचा संताप

आंघोळीविना पहिल्यांदाच गुढीपाडवा!; औरंगाबाद महापालिकेच्या नावाने नागरिकांची ओरड
औरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच औरंगाबादकरांना शनिवारी आंघोळीविना नवीन वर्ष गुढीपाडवा साजरा करावा लागला. सिडको-हडकोसह जळगाव रोडवरील विविध वॉर्डांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना मागील ७ दिवसांपासून पाणीच मिळाले नाही. प्रत्येक वॉर्डात महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नगरसेवक वॉर्डात पायही ठेवू शकत नाहीत, एवढे वातावरण तापले आहे. पाणी प्रश्न पेटलेला असताना लोकसभा निवडणुकांसाठी मते मागायला कसे जावे, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला आहे.
हिंदू संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते. पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी अनेक नागरिक वर्षभर वाट पाहतात. पाडव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनिवारी पाडव्याच्या दिवशी नागरिकांना आंघोळ करून पूजा करायची असते. घरासमोर गुढी उभारावी लागते. हे धार्मिक विधी आंघोळीशिवाय शक्यच नाहीत. घरात आंघोळीसाठी पाणीच नसेल तर पाडवा कसा साजरा करणार? शिवसेना-भाजप युतीचे प्राबल्य असलेल्या वॉर्डातील नागरिकांना पाडव्याच्या दिवशी मनपाने एक थेंबही पाणी दिले नाही. सुदर्शननगर, सुरेवाडी, मयूरनगर आदी वॉर्डांतील नागरिकांना मागील सहा ते सात दिवसांपासून पाणीच देण्यात आलेले नाही.
घरात पिण्यासाठीही पाणी नसल्याचे चित्र आहे. पाणी प्रश्नावरून नागरिक वैतागून घर सोडत असल्याने अनेक नगरसेवकांनी आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत. वॉर्डातील नागरिकांनी फोन केला तर अनेक नगरसेवक फोनच उचलत नाहीत. नगरसेवकांनी सहज वॉर्डात फेरफटका मारला तर नागरिक पाण्यासाठी भंडावून सोडत आहेत. वॉर्डात पाय ठेवणेही नगरसेवकांना मुश्कील झाले आहे. शनिवारी ‘लोकमत’प्रतिनिधीने टीव्ही सेंटर भागातील विविध वॉर्डांमध्ये फेरफटका मारला असता विदारक चित्र समोर आले. महापालिका वेळेवर पाणी देऊ शकत नसेल तर किमान टँकरने नागरिकांना पाणी द्यायला हवे.
जाधववाडीत दोन एप्रिलला पाणी दिले
जाधववाडी भागात २ एप्रिल रोजी अत्यंत कमी दाबाने मनपाने पाणीपुरवठा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत पाणीच आले नाही. कधी येईल, याचाही नेम नाही. अधिकारी नगरसेवकाचे अजिबात ऐकत नाहीत. टँकर देत नाहीत. पाण्यामुळे नगरसेवकपदाचे राजीनामे देऊन मोकळे व्हावे असेही काहींनी नमूद केले.
तीन आठवड्यांपासून पाणी नाही
सुदर्शननगर भागात तर नागरिकांना तीन आठवड्यांपासून पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होतो. महापालिकेने पाण्याची वेळ बदलूनही पाणी दिल्यास वीजपुरवठा खंडित होतो. मोटार लावल्याशिवाय एक हंडाही पाणी मिळत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. चार दिवसांपूर्वी तरुणांनी टाकीवर भांडणे करून एक टँकर आणला होता. टँकरने पाणी देताना अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वाया जाते.
मयूरनगरचे हाल
मयूरनगर भागात मागील ७ दिवसांपासून पाणी आले नाही. नगरसेवक दररोज पाण्याच्या टाकीवर जाऊन बसतात. अधिकारी म्हणतात, प्रलंबित पाण्याचे टप्पे झाल्यावर तुमच्या वॉर्डाला पाणी देण्यात येईल. नेमके कधी देणार हे सांगत नाहीत.