जीएसटी कपात: छोट्या दुकानदारांकडे जुने भाव, तर सुपर शॉपीत सवलती! ग्राहकांमध्ये संभ्रम
By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 4, 2025 18:36 IST2025-10-04T18:35:36+5:302025-10-04T18:36:44+5:30
व्यापारी म्हणतात किमती कमी होण्यास आणखी महिनाभर लागेल

जीएसटी कपात: छोट्या दुकानदारांकडे जुने भाव, तर सुपर शॉपीत सवलती! ग्राहकांमध्ये संभ्रम
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने जीएसटीत कपात जाहीर केल्यानंतर ग्राहकांना भावकपातीचा त्वरित लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, घोषणा होऊन १२ दिवस झाले तरी अजूनही किराणा व्यापारी जुना एमआरपीतच माल विकत आहेत, तर सुपर शॉपी, मॉलमध्ये जुन्या वस्तूवर नवे दर लागू झाले आहेत. एकीकडे व्यापाऱ्यांमध्ये वैचारिक गोंधळ उडाला आहे. किमतीमधील विरोधाभासामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
काय म्हणतात ग्राहक-व्यापारी
आमच्या प्रतिनिधीने मोंढ्यात फेरफटका मारला असता किराणा सामान खरेदीसाठी आलेल्या संजय विसपुते यांनी सांगितले की, सरकारने जीएसटी कपात केली तरी दुकानदारांकडे दर कमी होत नाहीत. मग सवलतीचा फायदा नेमका कोणाला मिळतो? दुसरीकडे व्यापारी सांगत आहेत की, जुना साठा संपेपर्यंत दरात प्रत्यक्ष घट होणे अशक्य आहे. जीएसटी कमी झालेला नवीन एमआरपीचा माल बाजारात येण्यास आणखी महिनाभराचा अवधी लागेल. कारण, कंपन्यांकडे जुनी एमआरपी असलेला माल मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.
सुपर शॉपी, माॅलवाल्याने केले भाव कमी
एकीकडे किरकोळ किराणा विक्री करणारे व्यापारी जुन्या एमआरपीच्या वस्तू विकत आहेत, तर दुसरीकडे सुपर शाॅपी व मॉलवाल्यांनी जुन्या एमआरपीवर जीएसटीची कपात लागू करून ती विकणे सुरू केले आहे.
प्रकार जुनी एमआरपी नवी एमआरपी
१) टूथपेस्ट (१०० ग्रॅम) ७६ रु.-- ७० रु.
२) सुगंधित साबण (१५० ग्रॅम) ८० रु.--७२ रु.
३) अँटिसेफ्टिक साबण (१०० ग्रॅम) ४६ रु.--४० रु.
४) टूथब्रश ३० रु.---२५ रु.
५) शॅम्पू (१०० ग्रॅम) ६० रु.--५५ रु.
६) फरसान (प्रति किलो) १४५ रु.-- १३५ रु.
७) टोमॅटो सॉस (९०० ग्रॅम) १०० रु.--९३रु.
८) जॅम (५०० ग्रॅम) २०० रु.--१८५ रु.
९) बिस्कीट (१ किलो) १६० रु.--१४० रु.
भाव तेच वजन वाढविले
काही कंपन्यांनी टूथपेस्ट व बिस्किटांचे एमआरपी जुन्याच ठेवल्या; पण वजन वाढविले आहे. जुनी किंमत १० रुपये कायम ठेवून टूथपेस्टचे जुने वजन १५ ग्रॅम होते ते वजन वाढून १८ ग्रॅम केले आहे, तर १० रुपयांच्या बिस्कीटचे भाव तेच ठेवून वजन ८० ग्रॅम हून ११० ग्रॅम केले आहे.
जीएसटी कपात करून विका
केंद्र सरकारने किराणा दुकानातील काही वस्तूंवरील जीएसटी कपात केली आहे. ज्या व्यापाऱ्यांची नोंद जीएसटीत आहे. अशा व्यापाऱ्यांनी एमआरपीतून जीएसटी कपात करून माल विकणे आवश्यक आहे. इतर व्यापाऱ्यांनी आपल्या डीलर्सशी बोलून जीएसटी कपात करून माल विकावा.
-संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
किराणा सामानावर किती टक्के जीएसटी
प्रकार आधी जीएसटी - आता जीएसटी
१) किराणा सामान १८- १२ - ५ टक्के ---- आता ५ टक्के
२) रोजच्या वापरातील वस्तू-- १८ व १२ टक्के--- आता ५ टक्के