पदवीधर आमदारकीचे 'लक्ष्य'; विरोध झुगारून निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख भाजपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:22 IST2025-10-30T12:20:44+5:302025-10-30T12:22:04+5:30
मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर यांनी जुळवून आणला योग

पदवीधर आमदारकीचे 'लक्ष्य'; विरोध झुगारून निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख भाजपात
छत्रपती संभाजीनगर : आगामी काळातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या तोंडावर सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व समर्थकांनी बुधवारी मुंबईत पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षातील अनेकांचा विरोध असतानाही ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर यांनी या प्रवेशाचा योग जुळवून आणला.
यावेळी आ. अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रवेशाचा विषय गेला. मंत्री आणि महामंत्री असताना पक्षप्रवेश थांबत असेल तर आमचा उपयोग काय, अशी खंत केणेकरांनी व्यक्त केल्यानंतर अखेर प्रवेश दिल्याचे भाजप सुत्रांनी सांगितले.
एम. के. देशमुख, निवृत्त उपसंचालक भाऊसाहेब तुपे, रमेश तांगडे, शिवाजी पवार, व्यंकटेश कोमटवार, मनोज पाटील, संस्थाचालक महामंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब जगताप, शिवाजी देवरे, प्रा. रामलाल पंडुरे, प्रा. अभिलाष सोनवणे, राजीव शिंदे, विजय द्वारकोंडे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पदवीधर निवडणूक होणे शक्य आहे. सध्या मतदार नोंदणी सुरू आहे. युती करून हा मतदारसंघ लढण्याची कुठल्याच पक्षाची मानसिकता सध्या नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शरद पवार गट, ठाकरे सेना, शिंदेसेनेतील इच्छुक उमेदवारीची तयारी करीत आहेत. भाजपनेदेखील देशमुख यांच्या रुपाने उमेदवार हेरला असून, स्वबळावरच भाजप पदवीधरला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.
भाजपची ताकद वाढेल
देशमुख यांच्या पक्षात येण्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपची ताकद वाढेल. त्यांना उमेदवारी देण्याबाबत पक्ष निर्णय घेईल.
-अतुल सावे, ओबीसी कल्याण मंत्री
उमेदवारीचा निर्णय पक्षाकडे
देशमुख यांच्यासह ४ माजी शिक्षणाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील संघटनांचे प्रमुख भाजपमध्ये आल्याने बळ वाढले आहे. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल.
- संजय केणेकर, आमदार
मतदारसंघ गिफ्ट देऊ
सावे यांच्या विनंतीवरून विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. सावेंचा आग्रह, केणेकरांच्या प्रयत्नांमुळे भाजपत प्रवेश केला. शिक्षक, पदवीधर मतदारसंघ विजयी होऊ, असे काम करू.
-एम. के. देशमुख, भाजप
पक्षांतर्गत होता विरोध...
देशमुख यांना भाजपमध्ये घेण्यास शहरातील पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. परंतु, मंत्री सावे आणि आ. केणेकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून देशमुख यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर केला. देशमुख पक्षात आल्यामुळे पदवीधर लढण्यासाठी जे इच्छूक आहेत, त्यांचे अवसान गळाले आहे. त्यामुळेच देशमुख व इतर पक्षात येऊ नयेत, यासाठी पक्षातील इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते.