शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:59 IST2025-10-30T18:59:32+5:302025-10-30T18:59:53+5:30
खुलताबादेतील २७ हजार शेतकऱ्यांना दमडीही नाही

शासनाची मदतीची घोषणा फसवी, शेतकऱ्यांच्या हातात दमडीही नाही; पुन्हा कर्ज घेण्याची वेळ
- दिलीप मिसाळ
गल्लेबोगाव (ता. खुलताबाद) : तालुक्यात १ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे पूर्ण होऊनही, बुधवारपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसानभरपाईचा एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, राज्य शासनाची दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा फसवी ठरल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तालुका प्रशासनाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार तालुक्यातील ७३ गावांमधील २७ हजार ८७२ शेतकऱ्यांच्या ३१ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी तहसील प्रशासनाने शासनाकडे २९ कोटी १५ लाख रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. राज्य शासनाने दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम थेट जमा करण्याची घोषणा केली होती; परंतु एक रुपयाही शासनाने अद्याप तालुक्याला दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
मदत मिळालीच पाहिजे
पंचनामे झालेत; पण काहीच निष्पन्न नाही. पिकांचं नुकसान झालं, मदत मिळालीच पाहिजे. अधिकारी आले, फोटो काढले; पण त्यानंतर काहीच हालचाल नाही. शेतकरी फसत आहेत.
- राहुल चंद्रटिके, शेतकरी, गल्लेबोरगाव
तीन दिवसांत मदत
आताच शासनाचा जीआर प्राप्त झाला आहे. आम्ही दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणार आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.
- स्वरूप कंकाळ, तहसीलदार
आता पुन्हा कर्ज काढण्याची वेळ
नुकसान होऊन महिना उलटला तरी मदत मिळाली नाही. शासनाने केलेली घोषणा फसवी ठरली आहे. हातात पैसे नसल्यामुळे आमची दिवाळी अंधारात गेली, आता पुढील शेतीच्या कामांसाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.