वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 19:38 IST2025-05-16T19:37:03+5:302025-05-16T19:38:12+5:30
पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगा; शिंदेसेना आणि भाजपवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे
छत्रपती संभाजीनगर: शहरात पाणी प्रश्न भीषण झालेला आहे, याला कोणत्याही वचनांची पूर्तता न करणारे सरकार जबाबदार आहे, हे सरकारी अपयश आहे, असा हल्लाबोल ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. या सरकारने अनेक वचने दिले, पण त्याची पूर्तता केली नाही. राज्यात नागरिक, शेतकरी, महिला सर्वांवर अन्याय वाढत आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही वचनपूर्ती होत नाही. पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगावी, अशी सडेतोड टीकाही त्यांनी शिंदेसेना आणि भाजपवर यावेळी केली. ते ठाकरेसेनेच्या लबाडांनो पाणी द्या या शहर पाणी प्रश्नावरील आंदोलनाच्या समारोपात मोर्चासाठी शहरात आले होते.
मागील महिनाभरापासून शहर पाणीप्रश्नावर ठाकरेसेनेचे लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू आहे. शहरातील विविध भागात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पाणी प्रश्नावर संताप व्यक्त केला. या आंदोलनांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेवर हल्लाबोल माेर्चा नेऊन होत आहे. क्रांती चौकातून सायंकाळी मोर्चास सुरुवात झाली. लबाडांनो पाणी द्या, असे बॅनर हातात घेऊन काही आंदोलक सहभागी होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेकडे रवाना झाले.
१६८० कोटींची योजना २७४० कोटींची कशी झाली
नवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मार्गी लागलेले काम आता अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.
ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवार
ठाकरे गट सोंग करीत असून मोर्चाचे ढोंग करीत आहे. मनपात सत्तेत असताना सर्वाधिक महापौर त्यांचे राहिले. त्यांच्या काळात पाणीपुरवठ्याचे वाटोळे होण्यासह अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे खरी लबाडी ठाकरे गटाने केल्याची टीका भाजपचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडमोडे यांनी केला.