आरक्षणासंबंधी सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:33 AM2018-08-01T00:33:31+5:302018-08-01T00:34:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट ...

The Government should immediately take positive steps towards the reservation | आरक्षणासंबंधी सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे

आरक्षणासंबंधी सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे

googlenewsNext
ठळक मुद्देकालबद्ध कार्यक्रमाची मागणी : मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या, जाळपोळ थांबविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट बांधून शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी व्यापक बैठक घेण्याचा निर्णय सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. समाजातील युवकांनी आत्महत्या करू नये, तसेच जाळपोळ तथा हिंसाचार करणाऱ्या घटनांंत पुढाकार घेऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्यव्यापी बैठक न्या. देशमुख यांच्या उपस्थितीत औरंगाबादलाच होईल, तिची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असे उद्योजक मानसिंग पवार यांनी जाहीर केले.
राज्यभरातील समाजातील ज्येष्ठ मान्यवर व संघटनांच्या नेत्यांना बोलावून त्या बैठकीत सरकार व समाजाला मार्गदर्शन करणारा व्यापक विचार पुढे यावा, असे न्या. देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरले.
सेवानिवृत्त न्यायमूर्ती देशमुख म्हणाले की, गेली अनेक वर्षे अहिंसेच्या मार्गानेच आंदोलने सुरू होती. मागील दोन वर्षेदेखील समाजाने शांततेने काढण्यात आलेल्या मोर्चातून ऐतिहासिक संदेश दिला. असे असताना सरकार काहीही निर्णय घेत नसल्यामुळे समाजाच्या शांततेचा संयम सुटला आहे. त्यामुळे समाजाला शांततेचे आवाहन करणे आवाक्याबाहेर झाले आहे. यासाठी सरकारने तातडीने आरक्षण व इतर मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. शासनाने सकारात्मक पाऊल उचलले, तर समाजाला शांततेचे आवाहन करण्यास बळ मिळेल. महाराष्ट्र पेटलेला असताना केंद्रीय नेतृत्व यावर काहीही बोलत नाही, असा मुद्दा उपस्थित करीत न्या. देशमुख म्हणाले की, आंदोलन तीव्र असावे; परंतु जाळपोळ, दहशत, आत्महत्येसारखे प्रकार नसावेत. सरकारवर दबाव वाढला पाहिजे; पण त्यात हिंसा नसावी. आज सरकार पोलिसांवर भिस्त ठेवून आहे. उद्या सरकार सैन्याचा किंवा शस्त्रसंधीचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करील. समाजाने हिंसा करून सरकारला तसे करण्यासाठी पूरक ठरू नये. सरकारला हे करणे तेवढे सोपे नाही; परंतु तसे पाऊल सरकारने उचलले, तर समाजातील तरुणांचे नुकसान होईल.
औरंगाबाद शहरात मे महिन्यात दंगल झाली. त्यानंतर कचरा प्रश्नामुळे शहर पेटले. आता या आंदोलनामुळे शहर धुमसत आहे. या सगळ्या घटनांचा परिणाम उद्योग, शहर, समाज आणि विभागाच्या विकासावर होतो आहे. ४ युवकांनी आत्महत्या केली आहे. आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी जाळपोळ, हिंसेऐवजी अहिंसेने हे आंदोलन पुढे न्यावे, असे उद्योजक पवार यांनी नमूद केले.
बैठकीला रमेश गायकवाड, प्रमोद खैरनार, प्रदीप पाटील, साकेत भांड, विवेक भोसले, जयराज पाथ्रीकर, सुभाष शेळके, औताडे यांची उपस्थिती होती. उद्योजक पद्माकर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आणि एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम हेदेखील बैठकीला येणार होते; परंतु काही कामामुळे त्यांनी समन्वयकांशी चर्चा करून येणार नसल्याचे सांगितले. या बैठकीला मराठा समाजासाठी विविध माध्यमांतून काम करणाºया संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अनेकांनी मांडल्या सूचना
या बैठकीला प्रा. प्रतापराव बोराडे, उद्योजक मानसिंग पवार, बी.एस. खोसे, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे यांनी विविध सूचना करून प्रस्ताव मांडले. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या आंदोलनात फूट पाडण्याचेदेखील प्रयत्न होत आहेत. त्यामुळे समाजमनावर त्याचे परिणाम होत असून, त्याचा भडका आंदोलनाला हिंसक वळण लागण्यातून उडतो आहे. समाजाला आंदोलन परवडणारे नाही, तसेच युवकांच्या आत्महत्यांनीदेखील प्रश्न सुटणार नाही, उलट प्रश्न वाढतील, असे प्रा. भराट म्हणाले. वाकडे म्हणाले की, जिल्हानिहाय संघटनांची राज्यव्यापी बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले जावे. खोसे म्हणाले की, कालबद्ध कार्यक्रम राबविणे आणि मेगा भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घेतला पाहिजे.

Web Title: The Government should immediately take positive steps towards the reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.