खुशखबर! पाणीपट्टी अर्ध्यावर, १५ एमएलडी पाण्यात वाढ; पालकमंत्री देसाई यांनी केल्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:26 IST2022-05-14T19:25:56+5:302022-05-14T19:26:51+5:30
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय

खुशखबर! पाणीपट्टी अर्ध्यावर, १५ एमएलडी पाण्यात वाढ; पालकमंत्री देसाई यांनी केल्या घोषणा
औरंगाबाद : महापालिकेकडून सध्या दरवर्षी ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. पाणीपट्टीत पन्नास टक्के म्हणजे दोन हजार रुपये कपात करण्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. लवकरच शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी १५ एमएलडीने वाढ करण्यात येईल. पाणीपुरवठ्याचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्याचा निर्णयही पालकमंत्र्यांनी घेतला.
शहरातील पाणीटंचाई आणि मनपाकडून आतापर्यंत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत आस्तिककुमार पाण्डेय यांनी ४२ मुद्यांवर उपाययोजना राबवून ८ दिवसांत शहरात १५ एमएलडीने अतिरिक्त पाणी वाढणार असल्याचे सांगितले. शहरात समाधानकारक पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत नागरिकांवर आकारण्यात आलेली ४ हजार ५० रुपये पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून ती २ हजार रुपये आकारण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. अनेक वसाहतींना आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना पाणीपट्टी ४ हजार रुपये घेतली जात असल्यामुळे नागरिकांकडून ओरड सुरू होती. आ. अंबादास दानवे, माजी सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री देसाई यांची भेट घेऊन पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करावी अशी मागणी केली होती. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नमूद केले की, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ४ हजार रुपयांची पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करून २ हजार रुपये करण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मनपा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल.