अबब! सोने ७० हजाराच्या घरात, आजपर्यंतचा सर्वाधिक भाव
By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 29, 2024 19:00 IST2024-03-29T19:00:40+5:302024-03-29T19:00:45+5:30
भाव वाढत असल्याने ज्वेलर्सच्या दुकानात अगदी तुरळक गर्दी दिसून येत आहे.

अबब! सोने ७० हजाराच्या घरात, आजपर्यंतचा सर्वाधिक भाव
छत्रपती संभाजीनगर : दहा ग्रॅम सोने खरेदीसाठी गुरुवारी तब्बल ६७ हजार ५०० रुपये मोजावे लागले यावर ३ टक्के जीएसटी धरल्यास ६९ हजार ५२५ रुपये म्हणजे ७० हजाराच्या घरात सोने जाऊन पोहोचले. यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांचे यामुळे डोळे पांढरे पडले. कारण, सोन्याला आजपर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. भाव वाढत असल्याने ज्वेलर्सच्या दुकानात अगदी तुरळक गर्दी दिसून येत आहे. ज्यांच्याकडे लग्नकार्य आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना बघण्यास मिळाले.
८८ दिवसांत वाढले ४ हजारांने भाव
१ जानेवारी २०२४ ला सोन्याचे भाव ६३ हजार ३५०रुपये प्रति १० ग्रॅम होते. मात्र, त्यानंतर सतत भाव वाढत गेले. फेब्रुवारीत ६३ हजार ५०० रुपयांनी सोने विक्री झाले. दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव ६७००० रुपये होते आज ६७ हजार ५०० रुपयांपर्यंत सोने जाऊन पोहोचले आहे. हे शुद्ध सोन्याचे भाव आहेत. नवीन वर्षातील पहिल्या ८८ दिवसात ४१५० रुपयांनी सोने महागले आहे.
सोने महागण्यात चीन देशाचा हात
जगात सध्या सर्वाधिक सोने खरेदी चीन देश करत आहे. जगातील सोन्याचा सर्वांत मोठा साठा आपल्याकडे असावा या उद्देशाने चीन मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत आहे. गोलमाल असलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी चीन हे पाऊल उचलत आहे. त्यामुळे जगभरातील विकसित देश सोने खरेदी करू लागले. खरेदीत स्पर्धा वाढल्याने सोने महाग होत आहे.
-गिरधर जालनावाला, ज्वेलर्स
जीएसटीसह सोने ७० हजार
गुरुवारी सोने ६७ हजार ५०० रुपये प्रति १० ग्रॅम विक्री झाले. त्यावर जीएसटी ३ टक्के म्हणजे २०२५ रुपये लागते. जीएसटीसह सोने ६९ हजार ५२५ रुपयांना विकत आहे.
-जुगलकिशोर वर्मा, ज्वेलर्स