उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला जाताय? काळजी घ्या एप्रिलसोबत मे महिन्यातही चोरटे सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:25 IST2025-05-02T12:19:58+5:302025-05-02T12:25:01+5:30

गावाला जाताना घ्या आवश्यक काळजी; जवाहरनगर, गारखेडा, वाळूज, एमआयडीसी वाळूजमध्ये सर्वाधिक घरफोड्या

Going for a walk during summer vacation? Be careful, thieves are active in April and May as well. | उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला जाताय? काळजी घ्या एप्रिलसोबत मे महिन्यातही चोरटे सक्रिय

उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला जाताय? काळजी घ्या एप्रिलसोबत मे महिन्यातही चोरटे सक्रिय

छत्रपती संभाजीनगर : घरफोड्या, लुटमारीच्या घटनांनी गेल्या दीड वर्षांत नवीन विक्रम रचला आहे. त्यातच आता उन्हाळी सुट्यांमध्ये गावाकडे, फिरायला जाणाऱ्या कुटुंबाचे घर लक्ष्य केले जात आहे. परिणामी, मार्च व एप्रिलमध्ये शहरात दिवसाला किमान तीन घरे फोडली जात आहेत. शहर पोलिस मात्र या चोऱ्या थांबविण्यात अपयशी ठरत आहेत.

गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याने सुट्यांमध्ये फिरायला गेलेल्या नागरिकांच्या घरांना चोरांकडून लक्ष्य केले जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत घडणाऱ्या चोऱ्या, लुटमारीचा आलेख सातत्याने वाढत आहे. मोठ्या सोसायटीत सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभावदेखील याला कारणीभूत ठरत आहे. पोलिसांचेदेखील गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याने रात्रीसह दिवसाही चाेरांकडून रेकी करून घरे फोडली जात आहेत. त्याशिवाय सिडको, उस्मानपुरा भागात शिक्षणासाठी मित्रांसोबत राहणाऱ्या तरुणांच्या घरांना लक्ष्य करत मोबाईल, लॅपटॉप चोरीला जाण्याचे प्रमाणही अधिक आहे.

दिवसाला किमान तीन चोऱ्या
जवाहरनगर, गारखेडा, वाळूज, एमआयडीसी वाळूजसह मुकुंदवाडी, ठाकरेनगरमध्ये सर्वाधिक घरफोड्या होत आहेत. यात सुरक्षारक्षक नसलेल्या अपार्टमेंटमध्ये चोर रेकी करून बंद फ्लॅट फोडतात.

गतवर्षी शहरात घरफोड्यांचा विक्रम
घरफोड्या - १४८
दिवसा - ४२
रात्री - १०६
दरोडा - १६

फिरायला जाताना घ्या ही काळजी
- दागिने आणि मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवा.
- फिरायला जाताना शेजाऱ्याला सांगून, स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून जा.
- वृत्तपत्र विक्रेता, दूध विक्रेत्याला दाराबाहेर वृत्तपत्र, दूध न ठेवण्याची सूचना करा.
- सोसायटीसाठी सुरक्षाक्षक नियुक्त करा. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावा.
- उच्च प्रतीची दरवाजाची चौकट, लॅच लॉक लावा.

उपाययोजना करतोय
घरफोड्या नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. अनेक घटनांत बाहेरील जिल्ह्यांतील चोर निष्पन्न झाले आहेत. नागरिकांनीदेखील बाहेर जाताना शेजारी, स्थानिक पोलिस ठाण्यात सांगून जावे. सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक नेमावा.
- संदीप गुरमे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

Web Title: Going for a walk during summer vacation? Be careful, thieves are active in April and May as well.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.