तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा...थांबविले कुणी? शिरसाटांचा जिल्हाध्यक्ष जंजाळांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:22 IST2025-11-27T18:22:50+5:302025-11-27T18:22:55+5:30
मंत्री आणि जिल्हाध्यक्ष यांच्या वादावर सोक्षमोक्ष एकनाथ शिंदेंच्या कोर्टात

तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा...थांबविले कुणी? शिरसाटांचा जिल्हाध्यक्ष जंजाळांवर पलटवार
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सार्वजनिकरीत्या टीकास्त्र सोडल्यामुळे पालकमंत्र्यांचा तीळपापड झाला. त्यांनी बुधवारी तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा, थांबविले कुणी? असे उत्तर देत जंजाळ हे शिंदेसेनेतून बाहेर पडले तरी काहीही फरक पडणार नाही, असे संकेत दिले. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात सोक्षमोक्ष होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले, राजेंद्र जंजाळ हे ‘विद्वान’ आहेत. ते तक्रार का करतात त्याचे कारण त्यांना आणि मलाही माहिती आहे, सगळीकडे जाहीर वाच्यता करीत माध्यमांकडे कशासाठी तुम्ही फिरत आहात? कुणाचे काय चुकतेय याचे उत्तर मी नक्की देईन. तुम्हाला अजून कुणाकडे जायचे असेल तर जा. त्यांना जिल्हाप्रमुख करण्यात माझा सहभाग होताच ना? अतिमहत्त्वाकांक्षा वाढल्याने असे होते. एकहाती पक्ष चालत नसतो. सर्वांना घेऊन काम करावे लागते. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. तुम्हाला इतर पक्षातून आलेले लोक चालत नाहीत. नंदकुमार घोडेले, विकास जैन, किशनचंद तनवाणी, अशोक पटवर्धन हे चालत नाहीत. इतर कुणाला घेतले तर चालत नाही. मग तुम्हाला चालतेय तरी कोण, हे सांगा. अशाने पक्ष चालत नाही. जिल्हाप्रमुखाचे अधिकार त्यांना कळत नसतील, तर त्यांनी काम करू नये.
त्या घटनेप्रकरणी दोषींवर कारवाई...
समाजकल्याणच्या वसतिगृहातील घटनेप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयात फोन करून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
जंजाळांची नाराजी २४ तासांत दूर होईल
जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील बेबनाव संपुष्टात येईल. जंजाळ यांची नाराजी २४ तासांत दूर होईल, असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. एकनाथ शिंदे प्रत्येकाशी चर्चा करतात, ते जंजाळ यांच्याशीही चर्चा करतील. पालकमंत्र्यांनी विश्वासात घेऊन काम करण्याची भूमिका ठेवावी, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
जंजाळ यांना शिंदे यांचा फोन
पालकमंत्री शिरसाट आणि जंजाळ यांच्यातील वाद एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला असून, शिंदे यांनी बुधवारी जंजाळ यांना फाेन करून नेमका काय प्रकार सुरू आहे, हे समजून घेतले. जंजाळ यांनी सायंकाळी शिंदे यांची विमानतळावर भेट घेत पक्षसंघटनेत कोण लुडबूड करीत आहे, हे त्यांच्या कानावर घातले. आता जंजाळ काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.