खऱ्या सोन्याचा मणी दाखवून परत घेतला, हाती खोटी माळ टेकवली; व्यापाऱ्याला १४ लाखांना चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:50 IST2025-05-20T14:49:30+5:302025-05-20T14:50:25+5:30
२ किलो खोट्या सोन्याची माळ देऊन व्यापाऱ्याला १४ लाखांना चुना

खऱ्या सोन्याचा मणी दाखवून परत घेतला, हाती खोटी माळ टेकवली; व्यापाऱ्याला १४ लाखांना चुना
छत्रपती संभाजीनगर : आधी एक खरा सोन्याचा मणी देत व्यापाऱ्याला मजुरांनी २ किलो साेन्याची खोटी माळ देत १४ लाख रुपयांना गंडा घातला. छावणीतील आनंदकुमार मुगदिया यांची ही फसवणूक झाली.
मुगदिया यांचे छावणीच्या नेहरु चौकात किराणा दुकान आहे. ८ मे रोजी सकाळी त्यांच्या दुकानात राजू प्रजापती व राम प्रजापती असे नाव सांगणारे दोन भाऊ खरेदीसाठी गेले. १२ मे रोजी सायंकाळी राम पुन्हा त्यांच्या दुकानावर गेला. बिलाच्या रकमेत १० रुपये कमी पडले म्हणून त्याने ब्रिटिशकालीन शिक्का दिला. मात्र, मुगदिया यांनी तो नाकारला. १४ मे रोजी सायंकाळी या दोन भावांनी त्यांना २ किलो सोन्याची माळ विक्रीला असल्याचे सांगितले. विश्वास बसण्यासाठी त्यांनी त्यातील एक मणी काढून तपासून पाहण्यास सांगितले. मुगदिया यांनी स्वत:च्या हाताने शेवटचा मणी काढून घेतला. सायंकाळी कासारी बाजारात तपासला असता तो २२ कॅरेटचा खरा मणी निष्पन्न झाला.
मणी परत घेतला, खोटी माळ टेकवली
रामने १५ मे रोजी मुगदिया यांची भेट घेतली. संपूर्ण माळ ५० लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखविले. मुगदिया यांनी २५ लाख रुपयांत मागितली. सौद्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी १६ मे रोजी पत्नी, आईचे दागिने बँकेत गहाण ठेवत १४ लाखांचे कर्ज घेतले. १७ मे रोजी सकाळी १४ लाख रुपये देत त्यांनी माळ घेतली. १८ मे रोजी तपासली असता ती साध्या धातूची असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी रॉयल असे लिहिलेल्या रिक्षातून (८३७३) मधून मुगदिया यांच्या घरी गेले होते. ते बारापुल्ला गेटपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. छावणी पोलिस अधिक तपास करत आहेत.