घरच्या सिलेंडरमधून कारमध्ये भरला गॅस; गाडी सुरू करताच किटमध्ये स्फोट, तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:00 IST2025-01-09T15:42:42+5:302025-01-09T16:00:53+5:30
सिल्लोड शहरातील घटनेत एका शेळीचा मृत्यू झाला

घरच्या सिलेंडरमधून कारमध्ये भरला गॅस; गाडी सुरू करताच किटमध्ये स्फोट, तिघे गंभीर जखमी
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : शहरातील आझादनगरमध्ये मारुती ओम्नी कारमध्ये घरगुती वापराचा गॅस भरताना झालेल्या स्फोटात पिता-पुत्रासह १२ वर्षांचा मुलगा, असे तिघ गंभीर जखमी झाले, तर एका शेळीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.
सिल्लोड शहरातील आझादनगरमध्ये बुधवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास शेख आझम नबी शेख (वय ३५ वर्षे), नबी अमीर शेख (वय ५६ वर्षे) हे त्यांच्या मारुती कारमध्ये (क्र एमएच ०९ जी ५७००) घरगुती वापराचा गॅस भरत होते. दोन सिलिंडर भरल्यावर तिसरा सिलिंडर भरताना गॅस किटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गॅस भरला गेला. यावेळी कारमध्ये बसलेले नबी अमीर शेख यांनी कार सुरू केली. यावेळी कारमधील गॅस कीटचा स्फोट झाला व काही क्षणातच कारने पेट घेतला. त्यामुळे आगीचा भडका उडाला. हे पाहून आझम शेख हे त्यांचे वडील नबी आमिर शेख यांना वाचवण्यासाठी पुढे आले. यावेळी कारमधून वडिलांना उतरवत असताना तेही आगीत होरपळून निघाले. तर तेथे बाजूला उभा असलेला शेख असद अकील (वय १२ वर्षे) हा मुलगाही भाजला गेला.
या घटनेत तिघेही २० ते २५ टक्के भाजले, तर बाजूलाच असलेल्या शेळीचा भाजून मृत्यू झाला. यावेळी जवळच्या नागरिकांनी पाण्याच्या साहाय्याने कारला लागलेली आग विझविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे त्यांना कठीण झाले. बरेच शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.
घाटीत उपचार सुरू
दरम्यान, या घटनेत भाजलेले शेख आझम नबी शेख, नबी अमीर शेख व शेख असद अकील यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे आरोग्य अधिकारी डॉ. राम मोहिते यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून तिघांनाही छत्रपती संभाजीनगर येथी घाटी रुग्णालयात रेफर केले.