लसूण म्हणतोय ‘अब की बार ४०० पार’; विक्रेते-ग्राहकांमध्ये दरवाढीवरून संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 18:11 IST2024-02-20T18:02:20+5:302024-02-20T18:11:53+5:30
मागच्या वर्षी लसणाचे लागवड क्षेत्र कमी असल्याने तुलनेने यावर्षी लसणाची आवक कमी प्रमाणात झाली.

लसूण म्हणतोय ‘अब की बार ४०० पार’; विक्रेते-ग्राहकांमध्ये दरवाढीवरून संघर्ष
- पूजा येवला/ आर्या राऊत
छत्रपती संभाजीनगर : जेवणात लसणाच्या पेस्टशिवाय कोणत्या भाजीचा विचार होऊच शकत नाही... पण, आता कारण लसणाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याचे दिसत आहे. ओला लसूण १८० ते २०० रु. किलो, तर कोरडा लसूण ४५० ते ५०० रु. किलोने भाव वाढला आहे.
कांद्याप्रमाणेच लसणाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत केली जाते. खरीप लसणाची जून-जुलैमध्ये लागवड करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जाते, तर रब्बी पिकासाठीची लागवड सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि मार्च-एप्रिलमध्ये त्याची कापणी केली जाते. पण, मागच्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
भाववाढीची कारणे काय ?
-मागच्या वर्षी लसणाचे लागवड क्षेत्र कमी असल्याने तुलनेने यावर्षी लसणाची आवक कमी प्रमाणात झाली. त्यामुळे बाजारात लसणाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
- लसणाला सातत्याने मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचा लसूण लागवडीचा ओघ कमी झाला त्यामुळे बाजारात येणारा माल देखील कमी झाल्याचे काहींनी सांगितले.
- स्थानिक व्यापाऱ्यांनी लसूण साठवणूक केल्यामुळे लसणात भाववाढ झाली. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये नवीन लसूण मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर लसणाचे दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लसणाचे भाव सातत्याने कमी जास्त होत आहेत त्यामुळे नेमका कधी आणि कोणत्या भावात लसूण खरेदी करावा, याबाबतीत ग्राहकांमध्ये संभ्रम वाढत आहे.
वापर कमी केला
रोजच्या स्वयंपाकात लसूण हा लागतोच त्यामुळे परवडत नसला तरी लसूण हा खरेदी करावा लागतोच. त्यामुळे रोजच्या वापरात फरक पडला आहे. १०० रु. पाव भाव असलेला कोरडा लसूण घेण्यापेक्षा ५० रु. पाव भावाने ओला लसूण घेणे त्या तुलनेने परवडते.
-कांचन राऊत, गृहिणी
साठवलेला वापर केला
भाव वाढल्यामुळे लसूण खरेदी केला नाही, घरात जो साठवून ठेवलेला होता तोच पुरवून वापरतेय. बाजारात गेल्यावर विक्रेते म्हणतात इतर कोणत्याही वस्तूत दर कमी होतील. पण, लसणामध्ये घासाघिस करू नका.
-पुष्पा येवला, गृहिणी
ग्राहक कमी झाले
दर वाढल्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. दररोज २ ते ३ किलो इतकाच लसूण विकला जातोय. खरेदीसाठी येणारे ग्राहक दर ऐकून विचार करायला लागतात आणि दर कमी करा म्हणून मागे लागतात. अवकाळी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे भाव वाढले.
-भास्कर ढवण, लसूण विक्रेते
लसणाच्या दरातील वाढ :
नोव्हेंबर २०२३ - २२० ते २५०
डिसेंबर २०२३ - २५० ते ३००
जानेवारी २०२४ - ३५० ते ४००
फेब्रुवारी २०२४ - ४०० ते ४५०
(सध्या ४०० रुपये किलो दरावर स्थिर)