गणेशभक्तांनो, मंडळातील ऐवजाची काळजी घ्या; चोरांकडून रेकीकरून दानपेटी, मोबाइल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:35 IST2025-09-02T18:35:18+5:302025-09-02T18:35:54+5:30
चोरांकडून गणेशमंडळे लक्ष्य; एपीआय कॉर्नरच्या मंडळामधून दानपेटी, मोबाइल लंपास

गणेशभक्तांनो, मंडळातील ऐवजाची काळजी घ्या; चोरांकडून रेकीकरून दानपेटी, मोबाइल लंपास
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गणेश मंडळांमध्ये रात्रीतून चोरांनी प्रवेश करून चोऱ्या सुरू केल्या आहेत. एपीआय कॉर्नर येथील मंडळात झोपलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या तीन माेबाइलसह चोरांनी दानपेटी लंपास केली. ३० ऑगस्ट रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
शहरात मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५० मंडळांची वाढ होत जवळपास ९५० ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पासाठी आकर्षक देखावे उभे केले. मूर्तीवर महागडे दागिनेही चढवले आहेत. मात्र, चोरांनी ही संधी साधत आता याच मंडळांमध्ये चोरीचा प्रयत्न सुरू केला आहे. एपीआय कॉर्नर येथील मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर कुबेर हे दि. ३० रोजी नेहमीप्रमाणे मंडळाच्या मंडपात निगराणीसाठी अन्य सहकाऱ्यांसह झोपले होते. पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना झोप लागलेली असताना ट्रीपलसीट आलेल्या चोरांनी काही वेळ बाहेर रेकी केली. त्यानंतर, एकाने मंडपात प्रवेश करून कुबेर यांच्यासह अन्य दोघांचे मोबाइल आणि मूर्तीसमोरील दानपेटी लंपास केली. सकाळी ७ वाजता त्यांना ही बाब लक्षात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी, रामनगरमध्येही रेकी
अशाच वर्णनाचे दुचाकीस्वार चोर रामनगर, मुकुंदवाडी परिसरातील मंडळाबाहेरही कॅमेऱ्यात कैद झाले. स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सिडको बस स्थानक आणि वसंतराव नाईक चौकात अशा चोरांनी लुटमार, चोऱ्या सुरू केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज असूनही पोलिसांना मात्र ते अद्याप सापडले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.