अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ४५ लाखांचा निधी, पण शाळांची उदासीनता!

By विजय सरवदे | Updated: May 28, 2025 20:24 IST2025-05-28T20:21:57+5:302025-05-28T20:24:35+5:30

गेल्या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शासनाने शाळांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याचे पोर्टल सुरू केले होते.

Funds of Rs 45 lakhs are available for Scheduled Caste students, but schools are indifferent! | अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ४५ लाखांचा निधी, पण शाळांची उदासीनता!

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ४५ लाखांचा निधी, पण शाळांची उदासीनता!

छत्रपती संभाजीनगर : शासनाकडून अनुसूचित जातीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेकरिता तब्बल ४५ लाखांचा निधी मंजूर आहे. पण, बहुतांश शाळांनी या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे शिफारस प्रस्तावच (याद्या) जि. प. समाजकल्याण विभागाकडे सादर केलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच अर्थात सुमारे पावणेपाच हजार शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पाठविण्यासाठी शाळांना २२ मे ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, १ मेपासून उन्हाळी सुट्ट्या लागल्या आणि शाळाच बंद झाल्या. परिणामी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळायची ‘शिफारस’च सरकारी दफ्तरात पोहोचली नाही. त्यामुळे प्रस्तावांची वाट जून-जुलैमध्ये पाहावी लागणार आहे, असे जि. प. समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विशेष म्हणजे, गेल्या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शासनाने शाळांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याचे पोर्टल सुरू केले होते. तांत्रिक अडचणीमुळे १२ मार्च २०२५ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे बहुतांश शाळांचे प्रस्ताव रखडल्याचे बोलले जाते. यामध्ये प्रामुख्याने वैजापूर व छत्रपती संभाजीनगर तालुक्यांचा समावेश आहे.

या आहेत शिष्यवृत्ती योजना...
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती : इयत्ता ८ वी ते १० वीमधील अनु. जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. जून ते मार्च असे दरमहा १०० रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती : अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या अनु. जाती प्रवर्गातील पालकांच्या ९वी, १०वीतील पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते.
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती : दहावीच्या परीक्षेत ६५ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते.
- धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती : अस्वच्छ व्यवसाय व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती दिली जाते.
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे योजना : मॅट्रिकपूर्व शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. यात शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क दिले जाते.

Web Title: Funds of Rs 45 lakhs are available for Scheduled Caste students, but schools are indifferent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.