पॅलेस्टाइन, गाझात मदतकार्याच्या नावाखाली निधी घोटाळा; देणगीदारांचीही चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:04 IST2025-11-15T17:02:51+5:302025-11-15T17:04:34+5:30
आर्थिक गुन्हे शाखेचे बँकेला पत्र, प्रत्येक व्यवहाराचे विश्लेषण करणार

पॅलेस्टाइन, गाझात मदतकार्याच्या नावाखाली निधी घोटाळा; देणगीदारांचीही चौकशी होणार
छत्रपती संभाजीनगर : पॅलेस्टाइन, गाझामधील मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहेमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून युनानी डॉक्टर सय्यद बाबर अली सय्यद महेमूद (रा. बदाम गल्ली, किराडपुरा) याने शेकडो लोकांकडून ९० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली होती. या घोटाळ्यात आता देणगी देणाऱ्यांची पोलिस चौकशी करणार असून, त्याबाबत माहिती मागविण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून इमाज अहेमद रजा फाउंडेशन ही संस्था फिलिस्तीन व गाझामधील युद्धाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी सोशल मीडियावर ‘क्युआर कोड’ पाठवून निधी गोळा करत असल्याचे एटीएसला समजले होते. तपासात ही संस्थाच नोंदणीकृत नसून संस्थेचा चालक व संशयित आरोपी सय्यद बाबर हा रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन नावाने संस्था चालवतो. त्याद्वारे विदेशी नागरिकांसाठी कुठलाही निधी गोळा करण्याचे अधिकार नसताना तो ‘यू ट्यूब’ व अन्य सोशल मीडियाद्वारे गाझा, पॅलेस्टाइनमधील युध्दग्रस्त नागरिकांसाठी निधी गोळा करण्यासाठीचे व्हिडीओ टाकत होता. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर विविध संस्था व त्यांचे आर्थिक व्यवहार तपासत असताना ही बाब एटीएसच्या निदर्शनास आली. त्यानंतर सिटीचौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राथमिक फसवणुकीचेच कलम
सय्यद बाबरवर एटीएसने कारवाई करत गुन्हा दाखल केला. मात्र, त्यात प्राथमिक स्तरावर केवळ फसवणुकीचे कलम असून, अद्याप देशविरोधी कृत्याचे पुरावे मिळून आलेले नाहीत. त्याने विदेशी संकेतस्थळावर पाठवलेल्या १० लाखांच्या व्यवहाराबाबत मात्र केंद्रिय तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू केला आहे.
देणगीदारांची चौकशी, बँकेला पत्रव्यवहार
बाबरला देणगी दिलेल्या देणगीदारांची माहिती गोळा करण्यास आता आर्थिक गुन्हे शाखेने सुरुवात केली आहे. त्यासाठी बँकेला पत्रव्यवहार केला असून, रोखीच्या स्वरुपातही बाबरने मोठ्या प्रमाणात निधी गोळा केल्याचा संशय असून, त्यानुषंगाने त्याची चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.