थकीत एफआरपीसाठी ऊस उत्पादकांचे साखर सहसंचालकांच्या कार्यालयालात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:12 IST2018-08-08T18:11:42+5:302018-08-08T18:12:34+5:30
बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यापासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) दिली नाही. यामुळे तेथील ऊस उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडकले.

थकीत एफआरपीसाठी ऊस उत्पादकांचे साखर सहसंचालकांच्या कार्यालयालात धरणे आंदोलन
औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यापासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) दिली नाही. यामुळे तेथील ऊस उत्पादकांनी आज सकाळी ११ वाजता येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात धडकले. मात्र, सर्व कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयाचे कुलूप उघडलेच नाही. यामुळे त्यांनी गेटवर घोषणाबाजी सुरु केली. संतापलेल्या ऊस उत्पादकांनी अखरे क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरु केले.
क्रांतीचौकात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे कार्यालय आहे. आज सकाळी बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक उस उत्पादकांनी या इमारतीत जिन्याच्या पायऱ्यावर बसून आंदोलन सुरु केले. कर्मचारी संपावर असल्याने आज या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. प्रादेशिक सहसंचालक एन.व्ही.गायकवाड याही कार्यालयात आल्या नाहीत. शेतकऱ्यांनी साखरकारखानदार व सरकार,प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऊसउत्पादक कार्यालयासमोर बसून होते.
८ महिन्यांपासून रक्कम थकीत
बीड जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठीही सहसंचालक न आल्याने संतापलेल्या ऊसउत्पादकांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरु केले. शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी सांगितले की, माजलगाव येथील जयमहेश शुगर इंडस्ट्रीज, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर सुमारे १५० कोटीपर्यंत आहे तो दिला नाही. मागील ८ महिन्यापासून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभावावर सरकारने तूर, मका खरेदी केला पण त्याची रक्कम खात्यावर जमा झाली नाही. तसेच कर्जही मिळाले नाही. उसाचे एफआरपी मिळाली नाही. अखेर शेतकऱ्यांनी काय करावे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनात वसंत सोनवणे, शेख युनूस, गणेश साळुंके, शिवाजी शिंदे, बालाजी फुंडकर, लक्ष्मण भागवत, राजु पठाडे, अशोक गायकवाड,सय्यद पठाण यांच्यासह बीड जिल्ह्यातील उस उत्पादक हजर होते.