बाजारात फळांच्या राजापासून द्राक्षांपर्यंत फळांची रेलचेल, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 14, 2024 11:27 AM2024-03-14T11:27:58+5:302024-03-14T11:29:23+5:30

आंब्यांपासून ते द्राक्षांपर्यंत सर्वच रसाळ फळे उपलब्ध झाल्याने हा काळ खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे.

From the king of fruits mango to grapes in the market, the prices of fruits are within the reach of common people | बाजारात फळांच्या राजापासून द्राक्षांपर्यंत फळांची रेलचेल, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात

बाजारात फळांच्या राजापासून द्राक्षांपर्यंत फळांची रेलचेल, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात

छत्रपती संभाजीनगर : रसाळ फळांची बाजारात जणू जत्रा बहरली आहे. शहागंजात तर फळांचा सर्वांत मोठा बाजार बहरला आहे. फळांचा राजा आंब्यापासून ते द्राक्षांपर्यंत सर्व फळे सध्या बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. विशेष म्हणजे, रमजान महिन्याला सुरूवात होण्यापूर्वीच बाजारात सुमारे ५० टन फळांची आवक झाली आहे.

लालबाग, बदाम बाजारात
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात बंगळुरूहून बदाम आंबा आला होता. त्यानंतर लालबाग आंबा सर्वत्र दिसू लागला. काही ठराविक हातगाड्यांवर व फळांच्या दुकानात सध्या तुरळक आंबे विक्रीला उपलब्ध झाले आहेत. आता रत्नागिरीच्या हापूस आंब्याची प्रतीक्षा केली जात आहे.

केळीच डझनावर; बाकी फळ किलोवर
पूर्वी काही फळे ही डझनावर विकली जात होती. आता फक्त केळीच डझनावर विकली जातात. अन्य सर्व फळे किलोवर विकली जात आहेत.

रोजा सोडण्यासाठी फळांचा वापर
फळांचे सेवन करून रमजान महिन्यात सायंकाळी रोजा (उपवास) सोडला जातो. यामुळे बाजारात ८० ते १०० टनांपेक्षा अधिक फळांची दररोज विक्री होते. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० टन फळांची आवक झाली. आता दररोज फळांची आवक वाढून १०० टनापर्यंत जाऊन पोहोचेल, अशी माहिती जुनेद खान यांनी दिली.

फळांचे आजचे भाव
फळ किंमत (किलो)
लालबाग आंबा १६० ते २०० रु.
बदाम १०० ते १२० रु.
पपई ४० ते ५० रु. (नग)
टरबूज २० ते २५ रु.
खरबूज ४० ते ५० रु.
चिकू ५० ते ६० रु.
द्राक्ष ५० ते ६० रु.
पेरू ५० ते ६० रु.
अंजीर ६० ते ७० रु.
डाळींब १०० ते १५० रु.
संत्रा ३० ते ५० रु.
अननस ६० ते ७० रु. (नग)
किवी १०० ते १२० रु. (३ नग)
मोसंबी ५० ते ६० रु.
सफरचंद १५० रु.

खवय्यांसाठी पर्वणीच
आंब्यांपासून ते द्राक्षांपर्यंत सर्वच रसाळ फळे उपलब्ध झाल्याने हा काळ खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे. गावरान पेरू, आंबे; शिवाय इराणी सफरचंदेही मिळत आहेत. ५० ते १५० रुपये किलो दरम्यान फळे मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकही दररोज वेगवेगळी फळे विकत घेत आहेत.

Web Title: From the king of fruits mango to grapes in the market, the prices of fruits are within the reach of common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.