साथीदारांसाठी 'किंग ऑफ मर्डर'; एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:03 IST2025-06-26T16:01:02+5:302025-06-26T16:03:55+5:30
दरोडा प्रकरणी एन्काउंटर झालेल्या अमोलच्या बहिणीला देखील अटक, आतापर्यंत २१ आरोपींना अटक

साथीदारांसाठी 'किंग ऑफ मर्डर'; एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरचा व्हिडीओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एन्काउंटर केला. आता त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात अमोल पिस्तुल स्वच्छ करताना आणि गुन्हेगारी गर्वाने बोलताना दिसत आहे. व्हिडीओत त्याचे साथीदार त्याला “मर्डर किंग”, "किंग ऑफ मर्डर" म्हणून संबोधतात, तर बंदुका हातात घेऊन तो म्हणतो, “गोळ्यांची किंमत साधी नाही. एक सुपारी एक कोटी रुपये. समोरचा माणूस १०० टक्के संपतो, ही खात्री आहे." अशा वल्गना करत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ अमोलच्या गुन्हेगारी वृत्तीचा स्पष्ट पुरावा मानला जात असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
१४ मेच्या मध्यरात्री वाळूज एमआयडीसी परिसरात संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता. ५.५ किलो सोनं, ३२ किलो चांदी आणि ७० हजार रुपये असा ऐवज त्यांनी लंपास केला होता. ही घटना पोलिस ठाण्यापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर घडल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती. या दरोड्याचा कट रचणारा लड्डांचा बालमित्र बालासाहेब इंगोले असून, त्याने अमोल खोतकर, योगेश हाजबे व इतर सहकाऱ्यांसह दरोड्याचे नियोजन केल्याचे समोर आले. इंगोले व इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र अमोल फरार राहिला.
एन्काउंटर आणि साक्षीदाराचा जबाब
२६ मेच्या मध्यरात्री पोलिसांनी वडगाव कोल्हाटी ते सांजापूर रोडवरील एका हॉटेलजवळ अमोल खोतकरचा शोध घेत सापळा रचला. पोलिसांना पाहताच अमोलने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांवर गोळी झाडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जागीच ठार झाला. घटनास्थळी अमोलसोबत त्याची मैत्रीण खुशी उर्फ हाफिजा शेख हिची उपस्थिती होती. तिने दिलेल्या कलम १६४ अंतर्गत न्यायालयीन जबाबात "अमोलनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडली" असल्याचे सांगितले. तिचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरतोय.
एकंदर गुन्हेगारी कारकिर्द
अमोल खोतकरने केवळ दरोडेच नाही, तर इतर गंभीर गुन्ह्यांतही सहभाग असल्याचा संशय आहे. ‘एक कोटीत गेम करतो’ असे म्हणणारा हा गुन्हेगार शेवटी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाला असला, तरी त्याचा व्हायरल व्हिडीओ, आणि मित्रमैत्रिणींचे जबाब अनेक प्रश्न उभे करत आहेत.
एन्काउंटर झालेल्या अमोलच्या बहिणीला अटक
उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगर येथील बंगल्यातील दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी तथा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरची बहिणी रोहिणी बाबूराव खोतकर (वय ३५, रा. आर्च आंगण, पडेगाव) हिस २३ जूनच्या रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी घरातील तुळशी वृंदावनाच्या खाली जमिनीत हातमोजामध्ये लपवून ठेवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली. दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे.