एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 21:04 IST2025-04-12T21:03:24+5:302025-04-12T21:04:23+5:30
जांभई पिंपळगाव रस्त्यावर भीषण अपघात : यात्रेतून परतणाऱ्या मोटारसायकलला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर ): देवीच्या यात्रेतून परतत असताना मोटारसायकलवरील चार युवकांचा भीषण अपघात झाला. जांभई पिंपळगाव रस्त्यावर एका वळणावर वेगात असलेल्या मोटारसायकलवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट शेतातील पाणी फिल्टर प्लांटच्या भिंतीवर आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (ता. ११) रात्री २ वाजता झाला.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघे म्हणजे आकाश अंबादास वाघ (वय १९, रा. पिंपळगावघाट) आणि विशाल पांडुरंग संमिन्द्रे (वय २०, रा. आमठाणा) हे होत. तर रितेश अंबादास साळवे (वय १८) आणि अनिकेत दत्तू जगताप (वय १६) रा. आमठाणा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सदर युवक एकाच मोटारसायकलवर आमठाण्याहून शुक्रवारी रात्री ९.३० वाजता जांभई येथे तुकाईदेवीच्या यात्रेला गेले होते. परतीच्या वाटेवर जांभई पिंपळगाव रस्त्यावर एका वळणावर हा अपघात झाला. चालक विशाल याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल थेट भिंतीवर आदळली. आकाश आणि विशाल यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने नागरिकांच्या मदतीने सिल्लोड रुग्णालयात हलवण्यात आले.
शनिवारी दुपारी १ वाजता आमठाणा येथील स्मशानभूमीत आकाश आणि विशाल यांच्या पार्थिवावर बाजूबाजूला दोन वेगवेगळ्या चितांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, आकाश वाघ हा अनाथ होता. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याचे आई-वडील मरण पावले होते आणि त्याचे पालनपोषण त्याची आत्या रेखा खरात करत होती. तर विशालच्या मागे त्याचे आई-वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.