चार उपसा पंप बंद; छत्रपती संभाजीनगरात कमी दाबाने पाणी; उमेदवारांचा दाब मात्र वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:11 IST2025-12-25T18:10:37+5:302025-12-25T18:11:13+5:30
छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना आणखी चार दिवस त्रासच त्रास

चार उपसा पंप बंद; छत्रपती संभाजीनगरात कमी दाबाने पाणी; उमेदवारांचा दाब मात्र वाढला
छत्रपती संभाजीनगर : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होतोय. कधी जलवाहिनी फुटते, तर कधी विद्युत पुरवठा खंडित होतो. आता जायकवाडीपासून फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत चार पाण्याचे पंप बंद आहेत. पाणी उपसा करणारे आणि लिफ्ट करणारे हे पंप आहेत. त्यामुळे शहरात कमी प्रमाणात पाणी येत असून, शहरवासीयांना किमान दोन ते तीन दिवस उशिराने पाणी मिळेल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
शहराची तहान भागविण्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत तीन जलवाहिन्या आहेत. यात सर्वात मोठी जलवाहिनी म्हणजे १,२०० मीमी व्यासाची आहे. यातूनच शहराला ७० टक्के पाणी मिळते. ही जलवाहिनी पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी जायकवाडी पंप हाउस येथे किमान ६ मोठे पंप चालवावे लागतात. त्यातील दोन पंप बंद आहेत. त्याऐवजी एक छोटा पंप चालत आहे. त्याची क्षमता खूपच कमी आहे.
जायकवाडीहून आणलेले पाणी अगोदर ढोरकीन येथे येते. तेथून पाणी लिफ्ट करून फारोळा येथे आणावे लागते. ढोरकीन येथील तीनपैकी दोनच पंप सुरू आहेत. एक पंप बंद आहे. फारोळा येथून नक्षत्रवाडीच्या डोंगरापर्यंत पाणी आणण्यासाठी ६ पंपची गरज असताना पाच चालत आहेत. येथेही एक पंप बंद आहे. ठिकठिकाणी एक किंवा दोन पंप बंद असल्याने शहरात पूर्ण क्षमतेने पाणी येत नाही. कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना कुठे एक तर कुठे दोन दिवस उशिराने पाणी द्यावे लागत आहे.
कोणत्या भागात सर्वाधिक त्रास
शहरात पूर्ण क्षमतेने पाणी आले, तर सहा दिवसाआड नागरिकांना पाणी देणे शक्य होते. पाणी कमी आणि कमी दाबाने येत असल्याने काही भागांत ८ दिवसाआड तर काही भागाला दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. हनुमान टेकडी, चिकलठाणा, चौधरी कॉलनी, जय विश्वभारती कॉलनी अशा वसाहतींना दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे.
'पाण्याचे राजकारण' अडचणीत
शहर पाणीपुरवठ्यावर अनेक वॉर्डातील माजी नगरसेवक, इच्छुकांनी आजपर्यंत राजकारण केले. विरोधकांना खोटे ठरविण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या वेळाही बदलण्याची किमया काहींनी केली आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळीत होतोय. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी माजी नगरसेवक व इच्छुकांना पाणी प्रश्नांवर भंडावून सोडले. त्यामुळे त्यांनी पाणी येणार नाही, गुरुवारी येईल, असे स्टेटस ठेवले.