माझा डबल गेम झाला म्हणत माजी सभापतींचा भाजपला राम-राम; आ. चव्हाण-पठाडे आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:05 IST2026-01-22T19:04:59+5:302026-01-22T19:05:29+5:30
पक्षाने डबल गेम केल्याचा आरोप करीत पठाडे यांनी भाजपला राम-राम करीत शिंदेसेनेत प्रवेश केला.

माझा डबल गेम झाला म्हणत माजी सभापतींचा भाजपला राम-राम; आ. चव्हाण-पठाडे आमनेसामने
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीच्या आ. अनुराधा चव्हाण आणि बाजार समितीचे माजी सभापती राधाकृष्ण पठाडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी बुधवारी झडल्या. पक्षाने डबल गेम केल्याचा आरोप करीत पठाडे यांनी भाजपला राम-राम करीत शिंदेसेनेत प्रवेश केला. लाडसावंगी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु भाजपने विजय काळे यांना उमेदवारी दिली.
आ. चव्हाण यांना बागडेंचे कार्यकर्ते संपवायचे आहेत
बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या सदस्यांना संधी द्या, असे सांगताना जि. प. लाडसावंगी गटातून तयारी करण्यासाठी पक्षाने आदेश दिला होता. त्यामुळे मी महिनाभर लाडसावंगी गटात फिरून चाचपणी केली. मात्र, आ. अनुराधा चव्हाण यांना भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचे जुने कार्यकर्ते संपवायचे आहेत. शिवाय, कानाखालच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पतीचा पक्षात हस्तक्षेप वाढल्याने मी आमदारांच्या मनमानीला कंटाळून धनुष्यबाण हाती घेतला आहे.
- राधाकिसन पठाडे, माजी सभापती, कउबा
बागडेंचे कार्यकर्ते सोबत; लवकरच दूध का दूध...
लवकरच 'दूध का दूध, पानी का पानी' होणार आहे. बागडे यांचे सगळे कार्यकर्ते सोबत आहेत. उत्साहाने ते काम करीत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी संयम बाळगावा. सर्वांना संधी मिळेल. आरोप करणाऱ्यांना सांगू इच्छिते की, पक्षाचे कॅमेरे सगळीकडे लागलेले आहेत. मार्केट कमिटीमध्ये जे घोटाळे करून ठेवले आहेत, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल. कार्यकर्त्यांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने आम्ही नियोजनपूर्वक लढत आहोत. मनपा निवडणुकीत १० पैकी ९ नगरसेवक निवडून आले. फुलंब्री नगरपंचायतीमध्ये नुकसान झाले, त्याची भरपाई करू.
- अनुराधा चव्हाण, आमदार