माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ईशा झा यांचा मारहाणीचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:10 IST2022-10-31T16:09:17+5:302022-10-31T16:10:24+5:30
मागील काही वर्षांपासून हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या ईशा यांच्या या आरोपाने माजी आमदार जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ईशा झा यांचा मारहाणीचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
औरंगाबाद: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांच्यासोबत कायम दिसाणाऱ्या ईशा झा यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. संशय घेऊन जाधव यांनी बेदम मारहाण केल्याचे ईशा झा यांचे म्हणणे आहे. एका व्हिडीओतून ईशा झा यांनी आपबिती कथन केली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्याचेही झा यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून जाधव यांच्यासोबत सावलीसारखी सोबत असणाऱ्या झा यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.
मागील काही काळापासून इशा झा या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत राहत होत्या. विविध कार्यक्रमात त्यांनी सोबत हजेरी लावली. तसेच अनेक जाहिरातींमधून देखील दोघांचे एकत्रित फोटो दिसत. दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी संशय घेऊन बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडिओ ईशा यांनी सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे. या व्हायरल व्हिडीओत ईशा झा यांनी म्हटले आहे की, आज हर्षवर्धन जाधव यांनी मला बेदम मारहाण केली आहे. माझे केस पकडून जाधव यांनी मला मुक्का मार देत मारहाण केली आहे. त्यामुळे पोलिसात मी तक्रार दाखल केली असून, आता काय होईल याबाबत मला माहित नाही.
संशयावरून केली मारहाण
तर पुढे बोलतांना त्या म्हणाल्या आहेत की, आता मी दमले आहे, माझ्यावर नेहमी संशय केला जातो, माझे नावं प्रत्येकाशी जोडले जातात. घरात असलेल्या एका मुलाशी माझे संबध जोडण्याच प्रयत्न केला. मला वाटले होते ते बदलून जातील, मात्र तसं झालं नाही. मला खूप मारहाण केली असून, मी कन्नड सोडून जात आहे. त्यामुळे यानंतर मी कधीच कन्नडमध्ये परतणार नसल्याचं देखील या व्हिडिओमध्ये ईशा झा यांनी म्हंटले आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या ईशा यांच्या या आरोपाने माजी आमदार जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.