पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत ‘समृद्धी’वरुन वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:15+5:302021-02-05T04:12:15+5:30
विजय सरवदे औरंगाबाद : एक मे अर्थात महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे ...

पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत ‘समृद्धी’वरुन वाहतूक
विजय सरवदे
औरंगाबाद : एक मे अर्थात महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नियोजन असून नागपूर ते शिर्डी मार्गे औरंगाबाद हा ५२० किलोमिटर अंतराचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. त्या दुष्टीने कंत्राटदार कंपन्यांची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत, असा दावा अधीक्षक अभियंता ए. बी. साळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
राज्याची उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण करता येईल, या दृष्टीकोणातून ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग ७०१ किलोमिटर लांबीचा असून तो १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांमधून जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये महामार्गाच्या कामाला ‘ब्रेक’ लागला होता. मात्र, आता सर्व कंत्राटदार संस्थांची कामे गतीने सुरू आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात ‘मेगा इंजिनिअरींग’ व ‘एल अँड टी’ या दोन कंत्राटदार संस्था काम करत आहेत. सावंगीजवळील डोंगरात (पूर्वेला) सध्या उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहे. साधारणपणे १२२ मिटर लांबीचा बोगदा तया झाला आहे. दुसऱ्या बाजूने अजून कामाला सुरूवात झालेली नाही. या आठवडाभरात बोगदा खोदणारे ‘मेगा’चे दुसरे यंत्र दाखल झाल्यास लगेच पश्चिमबाजूने काम सुरू केले जाईल. सावंगीजवळ औरंगाबाद- सिल्लोड रस्यावर मोठा उड्डाणपुल (अंडरपास जंक्शन) उभारला जात आहे. येथूनच औरंगाबादच्या वाहनधारकाला समृद्धी महामार्गावर जाता येईल व महामार्गावरुन खाली उतरता येईल. पुढे माळीवाड्याजवळही उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. १ मेपूर्वी उड्डाणपुलांची एक बाजू पूर्ण करुन त्यावरुन वाहतूक सुरू केली जाणार आहे.
चौकट....
एक लेन तरी खुली करण्याचा प्रयत्न
अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले की, या महामार्गावरील वाहुतीकीचा पहिला टप्पा १ मे रोजी सुरू करुन शिर्डीपर्यंत दुभाजकाजवळील किमान एक लेनवरुन तरी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आठ पदरी असलेल्या या महार्गाचे काही ठिकाणी पुल किंवा रस्त्याची कामे प्रगतीपथावर असून वाहतूक सुरु झाल्यास अशाठिकाण बाह्यवळण घेऊन वाहनांना जाता येईल. सावंगी येथील जंक्शनजवळ भूसंपादनाचा वाद उद्भवला आला आहे. अशा प्रकारचे काही ठिकाणी आलेले अडथळे लवकरच दूर केले जातील.