औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 14:47 IST2018-04-17T14:32:29+5:302018-04-17T14:47:11+5:30
औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग लागली आहे.

औरंगाबादमध्ये कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग
औरंगाबाद - मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेल्या पुलाखालील कचऱ्याला आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या एका बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यामुळे परिसरात धुराचे मोठ-मोठे लोट पसरून नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.
मध्यवर्ती बस स्थानकाला लागून असलेल्या सिद्धार्थ उद्यानासमोरील पुलाखाली मनपाकडून कचरा टाकण्यात येतो. यामुळे येथे कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान येथे अचानक आग लागली. काही नागरिकांनी याची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला कळवली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. यानंतर आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या काळात आगीमुळे पुलाखालून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते. यामुळे मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाणारी वाहतूक काही काळ प्रभावित झाली. तसेच नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.
मनपा विरोधात नागरिकांचा 'गार्बेज वॉक'
दरम्यान, शहरातील कचराकोंडीचा आज ६१ वा दिवस असून महापालिका प्रशासन या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. बैठका, निविदा प्रक्रियेतच वेळ वाया घालविण्यात येत आहे. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. यामुळे कचऱ्याचे ढिग सतत घुमसत असतात. या प्रश्नी मनपा विरोधात आज सकाळी शहरातील नागरिकांनी पैठण गेट येथून 'गार्बेज वॉक' काढण्यात आला. यावेळी महापौर व अतिरिक्त मनपा आयुक्तांनी शहर ३० एप्रिलपर्यंत कचरा मुक्त करण्याचे आश्वासन दिले.