शिवसेना नगरसेवक मकरंद कुलकर्णी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 20:06 IST2019-02-13T20:06:18+5:302019-02-13T20:06:41+5:30
पोलिसांनी आरोपी नगरसेवकांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

शिवसेना नगरसेवक मकरंद कुलकर्णी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
औरंगाबाद: शिवसेना नगरसेवकाविरोधात गतवर्षी विनयभंगाची तक्रार नोंदविणाऱ्या महिलेने १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नगरसेवकांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
मकरंद माधवराव कुलकर्णी(रा. एन-८,सिडको)असे गुन्हा नोंद झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडिता आणि आरोपी हे एकाच कॉलनीतील रहिवासी आहेत. ११ जानेवारी २०१८ रोजी पीडितेच्या तक्रारीवरून मकरंद कुलकर्णीविरोधात सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला होता. एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे असताना आरोपी मकरंदने आपली छेड काढल्याची तक्रार पीडितेने नोंदविली होती. तेव्हापासून मकरंद हा आपल्या सोसायटीत आणि परिसरात वाईट हेतूने पाठलाग करतो. मंगळवारी (दि.१२) दुपारी १.२० वाजेच्या सुमारास पीडिता एका औषधी दुकानातून औषधी खरेदी करून मोपेडने जात असताना त्यांच्या सोसायटीच्या गेटजवळ आरोपीने वाईट हेतूने हावभाव करून आपला विनयभंग केला.
याविषयी पीडितेने त्याच्याकडे जाब विचारल्यानंतर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले. याघटनेनंतर पीडितेने सिडको ठाण्यात नगरसेवक मकरंद कुलकर्णी विरोधात तक्रार नोंदविली.