छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी अंतिम अधिसूचना पुढील आठवड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:35 IST2026-01-10T12:34:35+5:302026-01-10T12:35:26+5:30
प्राथमिक अधिसूचनेवरील हरकती निकाली निघाल्यानंतर भूसंपादनाच्या क्षेत्रात बदलाची प्रक्रियाही पूर्ण झाली

छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी अंतिम अधिसूचना पुढील आठवड्यात
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जानेवारी २०२५ मध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. प्राथमिक अधिसूचनेवरील हरकती निकाली निघाल्यानंतर भूसंपादनाच्या क्षेत्रात बदलाची प्रक्रियाही पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर भूसंपादनाला गती येणार आहे.
चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी विस्तारासाठी १३९ एकर जमीन लागणार आहे. त्यासाठी शासनाने मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात ७३४ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. त्यानुसार प्रस्तावित १३९ एकर जागेपैकी १.५ एकर जागा वगळण्यात आली, तर दुसऱ्या गटातील ०.१६ एकर जागा वाढविण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत महिन्याभराचा वेळ गेला. आता विस्तारीकरणासाठी कोणाची किती जमीन संपादित केली जाणार आहे, याबाबतची कलम १९ ची अंतिम अधिसूचनेची प्रसिद्ध होणार आहे. विस्तारीकणासाठी आतापर्यंत २१७ कोटींचा निधी प्रशासनाला आलेला आहे.
अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जमीन मालकांना भूसंपादनाची नोटीस बजावली जाईल. त्यावर येणाऱ्या हरकतींची सुनावणी आणि सुनावणीअंती प्रारूप निवाडा तयार करून शासनाकडून भूसंपादनासाठी रकमेची मागणी केली जाईल. शासनाकडून निधी प्राप्त होताच अंतिम निवाडा जाहीर होईल.
- डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी.