धिंड, एन्काऊंटरची भीती, कुख्यात गुन्हेगार टिप्या घाबरून थेट न्यायालयात शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:19 IST2025-09-05T18:19:01+5:302025-09-05T18:19:24+5:30

गंभीर गुन्हा करून पसार झालेला टिप्या पसार होऊन यापूर्वी दोनवेळेस थेट न्यायालयात शरण आला आहे.

Fear of encounter, notorious criminal Tipya surrenders directly to court | धिंड, एन्काऊंटरची भीती, कुख्यात गुन्हेगार टिप्या घाबरून थेट न्यायालयात शरण

धिंड, एन्काऊंटरची भीती, कुख्यात गुन्हेगार टिप्या घाबरून थेट न्यायालयात शरण

छत्रपती संभाजीनगर : वाळुज येथे झालेले एन्काऊंटर, शहरात गुन्हेगारांच्या काढल्या जात असलेल्या धिंडीप्रमाणेच हाल होण्याच्या भीतीने महिन्याभरापासून पसार असलेला कुख्यात गुन्हेगार टिप्या ऊर्फ जावेद मसूद शेख (रा. विजयनगर) हा गुरूवारी दुपारी स्वत:हून न्यायालयात शरण आला. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

जुलै अखेरीस मोक्कासारख्या गंभीर कारवाईत टिप्या जामिनावर बाहेर आला होता. त्याच्या दहाच दिवसांत त्याने २ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता व्यावसायिक शेख अझर शेख गणी (वय ४०) यांना बारमध्ये खंडणी मागितली. ती देण्यास नकार देताच अन्य पाच गावगुंडांच्या मदतीने गारखेड्यात अडवून मारहाण करून तलवारीचा धाक दाखवत त्यांची दुचाकी व अडीच लाख रुपये लुटून नेले होते. शिवाय, सकाळपर्यंत आणखी पैशांची खंडणी मागितली. या घटनेनंतर टिप्या पसार झाला होता. जवळपास महिनाभर तो परराज्यात फिरत होता. पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही त्याच्या मागावर होते. मात्र, पोलिस दलातील काही लोकांच्या संपर्कात असल्याने तो शोध पथकांना गुंगारा देत फिरत होता.

कायम न्यायालयात शरण येतो
गंभीर गुन्हा करून पसार झालेला टिप्या पसार होऊन यापूर्वी दोनवेळेस थेट न्यायालयात शरण आला आहे. याहीवेळी वाळुज एन्काऊंटरप्रमाणे आपलेही हाल होण्याची भीती त्याला काही दिवसांपासून सतावत होती. शिवाय, गुन्हेगारांच्या काढल्या जाणाऱ्या धिंडीच्या बातम्या ऐकल्यानंतर तो पोलिसांऐवजी न्यायालयात शरण आला. गणेशोत्सवानंतर त्याचा ताबा घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मुकेशचा शर्टने आत्महत्येचा प्रयत्न, धिंगाणा
मुकुंदवाडीत दोघांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुकेश महेंद्र साळवे याने पोलिसांना अडचणीत आणण्याच्या उद्देशाने पाेलिस कोठडीत शर्टच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी दुपारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात या घटनेने पोलिसांची एकच धावपळ उडाली. तुम्हाला अडचणीत आणतो, अशी धमकी देत त्याने हे कृत्य केले. त्यानंतर त्याला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेताना त्याने पोलिस वाहनात आरडाओरड करत जाळीवर डोके आपटून धिंगाणा घातला. पोलिसांनी याची रितसर नोंद केली.

Web Title: Fear of encounter, notorious criminal Tipya surrenders directly to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.