साथीदारांच्या मदतीने चारवर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न वडिलांनी हाणून पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:30 IST2018-11-25T22:29:56+5:302018-11-25T22:30:26+5:30
अनैतिक देहव्यापार करण्याच्या उद्देशाने नातेवाईकच चारवर्षीय मुलीचे अपहरण करीत असल्याचा संशय खुद्द चिमुकलीच्या वडिलांनाच आला. त्यांनी अपहरणक र्त्यांचा पाठलाग केला. मात्र, अपहरणकर्ते चिमुकलीला कारमध्ये बसवून सुसाट निघाल्याचे पाहून वडिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला अपहरणकर्त्यांची माहिती कळविली अन् पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला.

साथीदारांच्या मदतीने चारवर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न वडिलांनी हाणून पाडला
औरंगाबाद : अनैतिक देहव्यापार करण्याच्या उद्देशाने नातेवाईकच चारवर्षीय मुलीचे अपहरण करीत असल्याचा संशय खुद्द चिमुकलीच्या वडिलांनाच आला. त्यांनी अपहरणक र्त्यांचा पाठलाग केला. मात्र, अपहरणकर्ते चिमुकलीला कारमध्ये बसवून सुसाट निघाल्याचे पाहून वडिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला अपहरणकर्त्यांची माहिती कळविली अन् पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. सातारा परिसरात बीड बायपासवर पोलिसांनी सिनेस्टाईल कार अडवून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून चिमुकलीची मुक्तता केली. हा खळबळजनक प्रकार जिन्सी परिसरातील संजयनगर येथे २४ रोजी दुपारी घडली.
अन्वर पठाण, शुभम लक्ष्मण महेकले, हसनखान नूरखान आणि संगमेश्वर रघुनाथ गाडे (सर्व रा. लातूर), अशी अटक अपहरणकर्त्यांची नावे आहेत. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, संजयनगर-बायजीपुरा येथील सय्यद झियाउद्दीन सय्यद नासेरउद्दीन हे वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी अन्वर हा त्यांचा मावसमामा आहे. काही दिवसांपासून शुभम हा सय्यद यांना फोनवरून शिवीगाळ करीत होता. शिवाय त्याने त्यांना मुलीचे अपहरण करण्याची धमकीही दिली होती. २४ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अन्वर हा सय्यद यांच्या घरी आला. त्यावेळी त्याने सय्यद यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर खुलताबाद येथे उरुसाला जात असून, मुसकुरा (वय ४) हीस सोबत नेतो, असे म्हणाला. मुसकुराला सोबत घेऊन तो जाऊ लागला. त्यावेळी सय्यद त्याच्या मागे आले. तेव्हा त्यांना धमकावणारा शुभम उभा दिसला. अन्वर, शुभम आणि त्याचे अन्य साथीदार हसन आणि संगमेश्वर हे मुसकुराला कारमधून नेताना दुरूनच त्यांच्या नजरेस पडले. सय्यद यांना संशय आल्याने त्यांनी घरापासून रेल्वेस्टेशनपर्यंत अन्य वाहनाने अन्वर आणि त्याच्या साथीदारांच्या कारचा पाठलाग केला. खुलताबादऐवजी ते दुसरीकडेच जात असल्याने सय्यद यांचा संशय बळावला आणि त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला त्या कारची माहिती दिली. अलर्ट झालेल्या शहर पोलिसांनी कारचा शोध सुरू केला तेव्हा ती कार रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरून महानुभाव आश्रम चौकमार्गे बीड बायपासने जात असल्याचे समजले. सातारा पोलिसांनी लगेच बायपासवर अन्वर आणि अन्य आरोपींच्या कारसमोर पोलिसांची गाडी आडवी लावून कार थांबविली आणि अन्वर, शुभम, हसन आणि संगमेश्वर यांच्या ताब्यातून चिमुकल्या मुसकुराची मुक्तता केली. त्यानंतर सर्व अपहरणकर्त्यांना जिन्सी ठाण्यात आणून अटक केली.