तस्करीमुळे एमपीडीए कारवाईत बाप कारागृहात, इकडे मुलाने सुरू केली गांजा विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:31 IST2025-05-22T19:27:41+5:302025-05-22T19:31:40+5:30
पोलिसांनी वडिलांवर कठोर कारवाई केली असताना मुलाने बापाच्या पावलावर पाऊल ठेवत गांजा विक्री सुरू केल्याचे आढळून आले.

तस्करीमुळे एमपीडीए कारवाईत बाप कारागृहात, इकडे मुलाने सुरू केली गांजा विक्री
छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गांजा तस्कर अशोक भालेराव याच्यावर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई करून त्याला तुरुंगात डांबले आहे. पोलिसांनी वडिलांवर कठोर कारवाई केली असताना मुलाने बापाच्या पावलावर पाऊल ठेवत गांजा विक्री सुरू केल्याचे आढळून आले. सिडको पोलिसांनी मिसारवाडी येथे आरोपीच्या घरावर छापा मारून एक किलो ३१० ग्रॅम गांजा जप्त केला. अमोल अशोक भालेराव (वय २६, रा. मिसारवाडी) असे गांजा विक्रेत्याचे नाव आहे.
सिडको पेालिसांनी सांगितले की, अमोल घरून गांजा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड यांच्या पथकाने मिसारवाडीतील अमोलच्या घरी पंचासमक्ष छापा मारला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अमोलची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गांजाच्या दोन पुड्या आढळून आल्या. यानंतर त्यास गांजाविषयी विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
यामुळे पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे जुन्या कपड्यामध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवलेला एक किलो ३१० ग्रॅम गांजा सापडला. हा गांजा जप्त करून आरोपीविरोधात सिडको पोलिस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक सुभाष शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय गायकवाड, सहायक उपनिरीक्षक शेवाळे, हवालदार मंगेश पवार, प्रदीप दंडवते, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे, सहदेव साबळे आणि महिला अंमलदार मंदा हांडके यांनी केली. सहायक निरीक्षक नितीन कामे तपास करीत आहेत.