बापाने जीवन संपवलं अन् जबाबदार कोण? त्याची मुलगी आणि जावई! कुटुंबात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:47 IST2025-10-03T18:46:58+5:302025-10-03T18:47:12+5:30
बापाच्या आत्महत्येप्रकरणी मुलीसह जावयाविरुद्ध गुन्हा, भावाने दिली तक्रार; कारण धक्कादायक

बापाने जीवन संपवलं अन् जबाबदार कोण? त्याची मुलगी आणि जावई! कुटुंबात खळबळ
फुलंब्री : तालुक्यातील पाल येथे ६३ वर्षीय शेतकरी वामनराव तुपे यांनी ३० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वामनराव यांची मुलगी आणि जावयाविरोधात बुधवारी रात्री फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाल येथील रहिवासी वामनराव तुपे यांनी ३० सप्टेंबरला सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचा मुलगा राजू तुपे यांनी फुलंब्री ठाण्यात तक्रार दिली. त्यात, वडिलांच्या मृत्यूसाठी माझी बहीण मंदा भागीनाथ काळे आणि तिचा पती भागीनाथ आसाराम काळे जबाबदार आहेत, असे म्हटले आहे. वामनराव तुपे यांच्या नावावर लहानेवाडी शिवारात तीन एकर ६ गुंठे जमीन होती.
१९ ऑगस्ट रोजी मुलगी मंदा व जावई भागीनाथ यांनी त्यांना उपचाराच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे नेले आणि त्यांच्याकडून दीड एकर जमीन बक्षीसपत्राद्वारे नावे करून घेतली. यानंतर, जमीन परत मिळावी, म्हणून वामनराव यांनी वारंवार सांगितले. मात्र, त्यांच्याकडून १५ लाख ५६ हजार रुपये देण्याची अट घालण्यात आली. यामुळे वामनराव हे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले होते. याच विवंचनेतून त्यांनी ३० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सहाणे करीत आहेत.