छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मशागत करताना अडचणी, असे मी वर्तमानपत्रात वाचले, निसर्गाने तुमच्या हातात दोन महिने दिले होते. पीक काढले की, लगेच मशागतीला सुरुवात करायला पाहिजे होती पण मार्च-एप्रिल महिन्यात लग्न लावत बसले आणि आता चिंता करून काय फायदा, अशा कानपिचक्या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांना दिल्या.
प्रसंग होता जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित ‘आंबा व मिलेट’ महोत्सवाच्या उद्घाटनाचा. याप्रसंगी पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, आ. अनुराधा चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक एन. बी. पाटील, महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदू काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बाजार समितीने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांच्या सोयीसाठी पेट्रोल पंपाचे लोकार्पण शुक्रवारी केले. त्यासाठी विविध परवानग्या मिळविण्यास तब्बल ७ वर्षे लागली. हाच धागा पकडून राज्यपाल बागडे यांनी खंत व्यक्त केली की, खासगी पेट्रोलपंप असता तर ६ महिन्यांत परवानगी मिळाली असती. सहकारी संस्थेच्या फायली लवकर मंजूर होतच नाहीत. ते म्हणाले, सहकारी संस्थेच्या हितासाठी सर्व संचालकांनी राजकीय पक्ष, राजकारण, मतभेद विसरून एकत्र यावे व कृउबाचा विकास साधावा.
सभापती राधाकिसन पठाडे यांनी प्रास्ताविक केले. राम शेळके यांनी आभार मानले. यावेळी उपसभापती मुरलीधर चौधरी, संचालक जगन्नाथ काळे, गणेश दहीहंडे, कन्हैयालाल जैस्वाल, देवीदास कीर्तिशाही, सचिव विजय शिरसाठ यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
कृउबा व संचालक श्रीमंतकृषी उत्पन्न बाजार समिती श्रीमंत आहे. येथील संचालकही श्रीमंत आहेत. खुद्द हरिभाऊ बागडे यांचे लक्ष कृउबावर असल्याने येथील कारभार चांगलाच चालला असेल असा आमचा समज आहे, यामुळे आम्ही इकडे लक्ष देत नाही. ज्यास कृउबा समितीचा कारभार जमला त्यास जिल्ह्याचे राजकारण चांगले जमते, असे म्हटले जाते. असा मार्मिक टोला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी लगावला.