शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 16:55 IST2021-07-29T16:50:06+5:302021-07-29T16:55:54+5:30
Farmer asks a questions to PM over 'Khet Ki Baat' : लोकसभेत खासदार समस्या मांडतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून समस्या मांडल्या.

शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न
- तारेख शेख
कायगाव (जि. औरंगाबाद) : परिस्थितीला हतबल झालेल्या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 'खेत की बात' करत अनेक सवाल उपस्थित करत आपली व्यथा मांडली. भाऊसाहेब शेळके असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक माग्न्यासुद्धा मांडल्या आहेत. शेतात प्रतीसंसद भरवत प्रधानमंत्री मोदी यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
लोकसभेत खासदार समस्या मांडतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून समस्या मांडल्या. मी जे मुद्दे मांडले ते मुद्दे लोकप्रतिनिधींनी संसदेत मांडले पाहिजे. मात्र तसे होत नसल्याने मी स्वतःच शेतात औतासमोर उभे राहून आपली व्यथा मांडली, असे भाऊसाहेब शेळके म्हणाले. शेतात प्रतिसंसद भरवत शेळके यांनी लोकप्रतिनिधी संसदेत बोलतात तसे लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान यांना उद्देशून आपले प्रश्न मांडले. या २२ मिनिटांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी इंधन दरवाढ, शेतमालाच्या कमी भावाचा मुद्दा उपस्थित केला.
यासोबतच कृषी कायदे रद्द करा, प्रधानमंत्री पीकविमा शेतकरी हिताचा राहिला नाही, उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, सहकारी कारखाने बंद होऊन शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने स्वस्तात विकले जात आहे, शेतकऱ्यांशी संबंधित ग्रामीण भागातील रस्ते प्रश्न आदी मुद्दे त्यांनी सविस्तर मांडले. या लाईव्हला ग्रामीण भागातील तरुणांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या उपक्रमाचे तरुणांनी कौतुक केले. तसेच शेळके यांनी विचारलेले प्रश्न आणि मागण्यांना आपला पाठींबा असल्याचे अनेकांनी कॅमेंट आणि शेअर करत दर्शवले आहे.