कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक
By Admin | Updated: July 29, 2014 01:07 IST2014-07-28T23:54:46+5:302014-07-29T01:07:43+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील शेतकरी सध्या पीकविमा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तलाठी सज्जावर खेटे घालत आहेत.

कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक
कडा : आष्टी तालुक्यातील शेतकरी सध्या पीकविमा भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तलाठी सज्जावर खेटे घालत आहेत. काही तलाठी सज्जावर दररोज येत नाहीत तर काहींनी अनधिकृत रायटर ठेवलेले आहेत. असे रायटर शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळून त्यांची पिळवणूक करीत आहेत.
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची कामे करण्यासाठी ४५ तलाठी आहेत. तलाठी कार्यालयातून सातबारा, आठ अ , जमिनीची खरेदी- विक्री केल्याची नोंद, पीक पेरा घेणे, शेतसारा आदी कामे होतात. तलाठी सज्जांसाठी तालुक्यात दर्जेदार इमारतीही बांधण्यात आलेल्या आहेत. असे असले तरी तलाठी संबंधित सज्जावर न राहता आष्टी, कडा सारख्या शहरातच राहत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गव्हाणे यांनी सांगितले. तालुक्यातील काही तलाठ्यांनी आष्टी, कडा येथे किरायाने खोल्या केल्या आहेत. व तेथेच आपले तलाठी कार्यालय थाटले आहे. वास्तविक तलाठ्यांनी ज्या ठिकाणी सज्जा आहे तेथे जाणे बंधनकारक आहे. मात्र असे असले तरी तलाठ्यांनी अनधिकृत कार्यालये थाटल्याने ग्रामस्थांना नाहक शहरात खेटे मारावे लागत आहेत.
सध्या पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शेतकरी तलाठ्यांकडे खेटे घालत आहेत. तलाठी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासही अनेक अडचणी येत आहेत.
तालुक्यातील काही तलाठ्यांनी सातबारा देण्यासह इतर कामे करण्यासाठी अनधिकृत रायटर ठेवलेले आहेत. तलाठी कार्यालयात आले नाहीत अशा वेळी हे अनधिकृत ठेवलेले रायटरच तलाठ्यांची मिजास मिरवितात. अनेकदा असे रायटर शेतकऱ्यांना उद्धटपणे वागणूक देत असल्याचे व कागदपत्र देण्यात जाणीवपूर्वक अडचणी आणत असल्याचा आरोप सचिन वाघुले यांनी केला.
तलाठ्यांनी अनधिकृत ठेवलेले रायटर सातबारा देणे, आठ अ, पिक पेऱ्याची नोंद करणे अशी कामे करतात. मात्र सदरील कागदपत्र देण्यासाठी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप अशोक वाघुले यांनी केला.
जमिनीची खरेदी विक्री संदर्भातील नोंद करण्यासाठी हजार ते दीड हजार रुपये तर इतर कागदपत्र देण्यासाठी पन्नास ते १०० रुपये उकळले जात असल्याचे रवि पाटील ढोबळे यांनी सांगितले.
तलाठ्यांनी सज्जावर राहावे, अशा सूचना गेल्या महिन्यातच तहसीलदारांनी दिल्या होत्या. मात्र तलाठ्यांनी पुन्हा आता अपडाऊन सुरू केल्याने शेतकऱ्यांचे हाल कायमच आहेत. याबाबत तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले की, चौकशी करून सज्जावर न राहणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करू असे सांगितले. (वार्ताहर)
पीकविमा भरण्यासाठी धावपळ
अनेक तलाठ्यांनी आपले कार्यालय थाटले कडा, आष्टी, धानोरा सारख्या शहरात.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांसाठी तलाठ्यांच्या कार्यालयात घालावे लागतात खेटे.
तलाठ्यांनी अनधिकृत ठेवलेले रायटर शेतकऱ्यांकडून उकळतात अव्वाच्या सव्वा पैसे.
मुख्यालयी न राहणाऱ्या व अनधिकृत कार्यालय सुरू करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई होणार