पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले; कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:26 IST2025-04-12T17:24:40+5:302025-04-12T17:26:05+5:30

सत्ता येताच कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. कर्ज माफ होईल या आशेवर परतफेड केली नव्हती. दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करायला सुरुवात केली आहे.

Farmers' bank accounts frozen for non-repayment of crop loans; what about the promise of loan waiver? | पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले; कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय?

पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले; कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय?

लाडसावंगी : शेतकऱ्यांनी पीक कर्ज परतफेड न केल्याने बँकेने खाते होल्ड केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकतेच नवीन अर्थिक वर्ष सुरू झाले आहे. बँकेच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने कर्ज माफीला बगल देत ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड करावी, असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे आश्वासन दिले त्याच्या हे विपरीत आहे. सत्ता येताच कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. कर्ज माफ होईल या आशेवर परतफेड केली नव्हती. दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करायला सुरुवात केली आहे.

आधीच छत्रपती संभाजीनगर तालुक्यात परतीच्या पावसाने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला होता. यात खरिपाचे मोठे नुकसान झाले. पीक विमा अद्याप मिळाला नाही. रब्बी हंगामातील पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडले नाहीत. त्यात बँकेने आता खाते होल्ड केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कर्जमाफी नाही, उलट खात्यातील पैसे निघेना
माझ्या खात्यातून थमद्वारे पैसे निघत नसल्याने करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलो असता आपले पीक कर्ज थकीत आहे. कर्ज व व्याज भरा. भरलेली रक्कम व्याज कपात करून बाकी रक्कम दोन दिवसात खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. माझे कर्ज दोन वर्षांपासून थकीत आहे. कर्जमाफी मिळेल अशी आशा होती. परंतु कर्ज माफ तर झालेच नाही, उलट खात्यात जमा असलेले पैसे मिळाले नाहीत.
- बाबासाहेब भीमराव पवार, लाडसावंगी शेतकरी

कार्यालयात संपर्क करा
आम्ही पीक कर्ज प्रकरणी शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले नाही. तसा आदेश अद्याप आला नाही. वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधावा.
- विवेक व्यवहारे, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र

खाते तपासणी करून सांगतो
अद्याप पीक कर्ज प्रकरणी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावले नाही. थकीत कर्ज एक- दोन वर्षे झाली असेल तर बँक सिस्टीममध्ये होल्ड लागू शकतो. शुक्रवारी खाते तपासणी करून कळवतो 
- विवेक राठोड, मुख्य शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर

मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे काढता आले नाही
मी लाडसावंगी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून दोन वर्षांपूर्वी ६० हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. मात्र दोन वर्षांपासून पीक कर्ज थकलेले आहे. माझ्या मुलाच्या हाताचे हाड मोडल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी खात्यातील पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघाले नाहीत. विचारपूस केली असता खाते होल्ड केले असल्याचे सांगितल्याने मुलाची शस्त्रक्रिया करता आली नाही.
- लताबाई बापुराव नाईक, शेतकरी, लाडसावंगी

Web Title: Farmers' bank accounts frozen for non-repayment of crop loans; what about the promise of loan waiver?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.