बळीराजा पुन्हा अडचणीत; मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:38 IST2020-03-02T14:32:26+5:302020-03-02T14:38:09+5:30
रविवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली़

बळीराजा पुन्हा अडचणीत; मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान
औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी हिंगोलीचा काही भाग वगळता सर्वच जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रबीसह आंबा, द्राक्षे आदी फळपिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत सापडला आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि गंगाखेड शहरात रविवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली़ दुपारपर्यंत जिल्ह्णामध्ये कडक ऊन होते़ सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला़ परभणी शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले़ थंड वारे वाहू लागले़ गंगाखेड शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ सायंकाळी ६़४५ च्या सुमारास पाथरी शहरातही विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला़
जालना जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे टेंभुर्णी, जाफराबाद, राजूरसह इतर भागातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. रबी ज्वारी, गहू, हरभऱ्यासह फळबागांनाही या पावसामुळे फटका बसला. खरीप हंगामातील पिकांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले होते. रबी हंगामातही या बेमोसमी पावसामुळे नुकसान होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी पहाटे अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा ते पाऊणतास झालेल्या या पावसामुळे
काढणीला आलेल्या खरीप पिकांसोबतच आंबा, द्राक्ष आदी फळबागांचे नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास वाशी तालुक्यातील पारगावसह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. खरिपासोबतच रबीच्या पिकांनाही ‘अवकाळी’ने तडाखा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रविवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले़ पावसामुळे विविध ठिकाणचे नुकसान झाले आहे़ कंधार तालुक्यातील कौठा, मुखेड, मुदखेड, नायगाव तालुक्यातील गडगा, नरसी परिसरात पाऊस पडला़ गडगा परिसरात प्रचंड वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाली़ तूर, हरभरा पिकांचे नुकसान झाले़ गहू, ज्वारी आडवी झाली़ रविवारी मुदखेडचा आठवडी बाजार होता़ पावसाने बाजार विस्कळीत झाला़
लातूर जिल्ह्णातरविवारी पहाटे व दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलकासा अवकाळी पाऊस झाला़ त्यामुळे आंबा, द्राक्षासह हरभरा, गहू, ज्वारी, करडई या पिकांना फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले आहे़ जिल्ह्णात यंदा रबीचा पेरा वाढला आहे़ सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून त्यापाठोपाठ ज्वारी, गव्हाचे प्रमाण आहे़ सध्या काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी करुन राशी करण्यासाठी बनीम रचल्या आहेत़ त्याचबरोबर ज्वारी हुरड्यात आहे़ गहूही काढणीच्या अवस्थेत आहे, अशा वेळी रविवारी पहाटे जिल्ह्णात अवकाळी पाऊस झाला़ त्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धांदल झाली़ औराद शहाजानी, साकोळ,
देवणी, हाळी हंडरगुळी, रेणापूर, अहमदपूर, पानगाव आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला़
बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
च्बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी सर्वच तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रबी हंगामातील गहू, हरभऱ्यासह उशिरा पेरा झालेल्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचानामे करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके हातची गेली होती. मात्र पाणीपातळीत वाढ झाल्याने रबी हंगामात ज्वारी, हरभरा तसेच गव्हाचे पीक शेतकऱ्यांनी घेतले होते. ४ लाख ३० हजार ६७३ हेक्टर क्षेत्रात रबी पिकांचा पेरा झाला होता. दोन दिवसांतील अवकाळी पावसाचा या पिकांना मोठा फटका बसला आहे. च्बहुतांश ठिकाणी आंब्याचा मोहोर झडला आहे. तसेच डाळींब, संत्री व मोसंबीच्या बागांनाही क्षती पोहोचली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, केज तालुक्यातील विडा, येवता, आष्टी तालुक्यातील अंभोरा, पिंपरी घाटा, अंबाजोगाई तालुक्यात उजनी,बर्दापूर, लोखंडी सावरगाव तसेच बीड तालुक्यात चौसाळा, पालसिंगन, बेलखंडी पाटोदा, पिंपळनेर आदी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
औरंगाबादेत पिकांचे नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्री ठिकठिकाणी पडलेल्या पावसानंतर रविवारीही दिवसभर आभाळ दाटून आले होते. यामुळे रबी पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. शनिवारी झालेल्या पावसाने सिल्लोड, कन्नड, सोयगाव या तालुक्यांतील विविध गावांत रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव परिसरात वादळी पावसामुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयगावसह तालुक्यात सुमारे ३ हजार हेक्टरवरील रबीची पिके जमीनदोस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बनोटी मंडळात पिके जमीनदोस्त झाली.कन्नड तालुक्यातील नागदजवळ जनावरांवर वीज पडल्याने पाच जनावरे दगावली.