शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 19:42 IST2024-10-14T19:38:27+5:302024-10-14T19:42:32+5:30
शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाने ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान राबविण्यास मान्यता दिली.

शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार
छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांना थेट शेतकऱ्यांचा माल मिळावा म्हणून महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला. राज्यातील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीला आठवडी बाजार भरविण्याची परवानगी दिली आहे.
शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाने ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान राबविण्यास मान्यता दिली. मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी चांगल्या प्रकारे बाजार भरवीत आहे. त्यांचा हा अनुभव डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनानेही शहरात सात ठिकाणी बाजार भरविण्यास मंजुरी दिली. शहराच्या आसपास पालेभाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी थेट विक्री करता येईल. नागरिकांनाही ताज्या पालेभाज्या, फळे घेता येतील.
या ठिकाणी भरेल बाजार
उल्कानगरी येथील मैदान, कारगिल मैदान-गारखेडा, मित्रनगर येथील जागा, समर्थनगर व्यायामशाळेसमोर, छत्रपती महाविद्यालयासमोरील खुली जागा, नक्षत्रवाडी पेट्रोल पंपाशेजारी मंदिराच्या पाठीमागील जागा, जवाहर कॉलनी-त्रिमूर्ती चौकमागील भाजी मंडईत बाजार भरविण्यात येईल. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीला दरमहा एक हजार रुपये (इतर कर वगळून) भाडे आकारणी करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.
‘लोकमत’चा पाठपुरावा
शहरात एकही चांगले भाजी मार्केट नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी होत असलेला त्रास समोर आणला होता. त्याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने शहरात सात ठिकाणी आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय घेतला.