कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:20 IST2025-06-23T18:20:26+5:302025-06-23T18:20:51+5:30

आरोपी बँकेत नोकरीला असल्याची माहिती, सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Family shaken, relative attempts witchcraft by throwing spelled mustard at door | कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न

कुटुंब हादरले, मंतरलेली मोहरी दारात टाकून नातेवाईकाकडूनच जादूटोण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक शनिवारी मंतरलेली पांढरी मोहरी एका कुटुंबाच्या दारात टाकून जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही घटना अयोध्यानगर, एन ७, सिडको भागात घडली. या प्रकरणी मोहरी टाकणाऱ्याविरुद्ध सिडको ठाण्यात २० जून रोजी गुन्हा नोंदवण्यात आला.

गजानन काशीराम शेकोकार (रा. म्हाडा कॉलनी, महावीर चौक) असे आरोपीचे नाव आहे. सुभाष बळीराम पिंजरकर (रा. अयोध्यानगर, एन-७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका शनिवारी त्यांच्या घरासमोरील ओट्यावर पांढरी मोहरी पडलेली दिसली. सलग तीन शनिवारी हाच प्रकार घडल्याने कुटुंबीय घाबरले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात नातेवाईक असलेला शेकोकार हा हेल्मेट घालून दुचाकीवरून येऊन मोहरी टाकताना दिसला. त्यांनी तत्काळ सिडको पोलिस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. सिडको ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी चौकशी करून तत्काळ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला. तपास हवालदार भीमराव शेवगे करीत आहेत.

आरोपी बँकेत नोकरीला
आराेपी गजानन शेकोकार हा एका बँकेत नोकरी करतो. नातेवाइकाच्याच घरासमोर जादूटोण्याचे साहित्य टाकीत असल्यामुळे संबंधित कुटुंबाला चांगलाच धक्का बसला आहे.

Web Title: Family shaken, relative attempts witchcraft by throwing spelled mustard at door